कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. कोंकणा सेन शर्मा आणि भूमी पेडणेकर त्यांच्या भूमिकेत चपखल बसल्या आहेत.

नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेला डॉली किट्टी और वोह चमकते सितारेची कथा स्वप्नांचा पाठलाग करणाऱ्या महिलांची आहे. अलंकृता श्रीवास्तवने याआधी लिपस्टिक अंडर माय बुरका हा महिला प्रधान चित्रपट काढला होता. यावेळी देखील महिलांचा संघर्ष दाखवण्याचं काम अलंकृताने केलं आहे. केवळ स्वप्नंच नाहीतर छोट्या-मोठ्या आकांक्षा, इच्छांच्या पूर्तीसाठी महिलांना कोणत्या गोष्टींना सामोरं जावं लागतं याचं चित्रण या चित्रपटात आहे.

जेव्हाही आपण हिंदी चित्रपटातील महिलांचे पात्र पाहतो तेव्हा असं जाणवतं हे पात्र पुरुषाच्या नजरेतून कसं दिसतं. त्यामुळे त्यात एक साचेबद्धपणा जाणवतो. बरीचशी पात्रं ही पुरुषांनी ठरवलेल्या तथाकथित नैतिकतेतूनच जन्माला आलेली असतात. त्यामुळे महिलांच्या प्रश्नाकडे पाहण्याचा महिलांचा नेमका दृष्टिकोन काय आहे, हे आपल्याला फारसं पाहायला मिळत नाही. पण डॉली, किट्टीमध्ये ती कमी पूर्ण झाल्यासारखी वाटते.

डॉली (कोंकणा सेन शर्मा) ही मध्यमवर्गीय महिला आहे. ती तिचे पती आणि दोन मुलांसोबत ग्रेटर नोएडामध्ये राहते. ती एका सरकारी कार्यालयात काम करते. केवळ ती महिला आहे म्हणून तिला सर्वांना चहा द्यावा लागतो. तिच्या घरी ती आपल्या नवऱ्याच्याच बरोबरीने सर्व कामे करते. पत्नीची जबाबदारी सांभाळून ती फ्लॅटचं डाउन पेमेंट देखील देते. तिचा फ्लॅट देखील तिच्या इतर आयुष्यासारखाच बनला आहे. त्या बिल्डरकडून फ्लॅटबाबत स्वप्नं तर खूप मोठी दाखवण्यात आली होती पण प्रत्यक्षात हाती काहीच लागलेलं नाही. तसंच काहीसं तिच्या आयुष्याचंही झालं आहे. तिच्या आयुष्यात अनेक प्रश्न आणि अडचणी आहेत पण ती त्याकडे कानाडोळा करते.

पण एकेदिवशी तिचं एकसुरी आयुष्य बदलतं. तिची बहीण किट्टी (भूमी पेडणेकर) तिच्याकडे राहायला येते. किट्टी देखील छोट्या शहरातून आलेली आहे. ते शहर आणि तिथल्या मानसिकतेपासून दूर जायचं असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहणं एकच पर्याय तिच्यासमोर असतो आणि त्यासाठी ती मोठ्या शहरात नोकरी करण्यासाठी आलेली असते.

किट्टी एका रोमान्स अॅपमध्ये काम करते. पुरुषांचा एकटेपणा घालवण्यासाठी फोनवरून कंपनी देण्याचं काम तिला करायचं असतं. कामाच्या निमित्ताने ती पुरुषांच्या स्वभावाचं निरीक्षण करू लागते. ते कोणताही प्रश्न कसा हाताळतात आणि त्यांच्या आयुष्यात आलेल्या स्त्रियांशी कसं वागतात याबद्दल ती जाणून घ्यायला लागते. याच बरोबर आपली स्वतःची ओळख काय आहे याचा शोध देखील ती घ्यायला लागते.

या चित्रपटात महिलांचे संघर्ष, त्यांना येणाऱ्या अडचणी या गोष्टी तर पाहायला मिळतातच, पण महिलांना त्यांच्या इच्छापूर्तीसाठी किंवा स्वतःची ओळख शोधण्यासाठी स्वतःशीच कसं झगडावं लागतं याचं चित्रण हा या चित्रपटाचा खरा आत्मा आहे. मुख्य भूमिकेतील दोन्ही कलाकार या अस्ताव्यस्त आहेत. पण त्यामुळेच त्यांच्या पात्रांना एक उठाव आला आहे. त्या त्यांच्या आयुष्यात अनेक प्रयोग करून पाहतात.

कधी त्या यशस्वी होतात तर कधी अयशस्वी, तरीही आपला आनंद नेमका कशात आहे, हे शोधण्याचा त्यांचा प्रवास निरंतर चालू राहतो आणि त्यातूनच त्यांना खरा आनंद मिळतोय असं जाणवतं. जशाजशा त्या स्वतःला स्वीकारू लागतात आणि स्वतःवर मेहनत घेऊ लागतात तसं ते पात्र समृद्ध होत आहे असं जाणवतं.

कलाकारांचा अभिनय ही चित्रपटाची जमेची बाजू आहे. कोंकणा सेन शर्मा आणि भूमी पेडणेकर त्यांच्या भूमिकेत चपखल बसल्या आहेत. विक्रांत मास्सेनी रंगवलेला आत्मकेंद्री आणि स्वार्थी प्रदीप अस्सल वाटतो.

डॉलीच्या व्यक्तिरेखेतील बदल उल्लेखनीय आहे. सुरुवातीला जेव्हा ती पाहते की आपल्या मुलाला बाहुल्यांसोबत खेळायला आणि मुलींसारखं राहायला आवडतं तेव्हा ती घाबरून जाते. पण नंतर ती त्याची लैंगिकता स्वीकारते. तिचा हा प्रवास असाधारण वाटतो.

या चित्रपटाच्या काही कमकुवत बाजू देखली आहेत. संगीत आणि पार्श्वसंगीत परिणामकारक नाही. तसेच चित्रपटाने अनेक विषयांना हात घातला आहे पण एकाही विषयाच्या ते मुळाशी गेलेत असं वाटत नाही.

काही दृश्यं कथा पुढे नेण्यासाठी निरुपयोगी वाटतात. केवळ दिग्दर्शिकेला आपला दृष्टिकोन प्रेक्षकांवर ठसवायचा आहे म्हणून ती दृश्यं टाकण्यात आली आहेत असं वाटतं. पण तरी देखील डॉली, किट्टी हा एक धाडसी प्रयोग आहे असं म्हणावं लागेल.

हा चित्रपट तुम्हाला विचार करण्यासाठी भाग पाडेल. जर समोरच्या व्यक्तीच्या दृष्टिकोनाची जाणीव तुम्हाला होते तर हा चित्रपट तुमच्याचसाठी आहे. तुमच्या पदरी निराशा पडणार नाही.

  • पंकज कुलकर्णी