शुजित सरकार दिग्दर्शित गुलाबो सिताबो चित्रपटतील अमिताभ-आयुष्मान ही जुगलबंदी सगळ्यांनाच आवडते आहे.

लखनौमधली एक जुनी-पुराणी पडायला आलेली हवेली फातिमा महल. हवेलीचा मालक 78 वर्षांचा मिर्झा आणि त्याच्या या हवेलीत 70 वर्षांपासून राहणाऱ्या कुटुंबातला तरुण बंकी. मिर्झा-बंकी या घरमालक-भाडेकरू यांच्या भांडणाचा नाटकीय प्रवास म्हणजे आज अमेझॉन प्राइनवर रिलीज झालेला चित्रपट ‘गुलाबो-सिताबो.’

 

आपल्या अभिनयानी गेली 5 दशकं जगभरातील प्रेक्षकांना वेड लावणारे महानायक अमिताभ बच्चन यांनी साकारलेला मिर्झा हा लखनौच्या नवाबांपैकी एक जख्ख म्हातारा. फातिमा महल या त्याच्या हवेलीची राखण करणारा. खरं तर हवेली त्याच्या पत्नीच्या नावे आहे पण हे खानदानी श्रीमंत आता गरिबीत जगणारे. उदरनिर्वाहाचं साधन हवेलीत असलेल्या भाडेकरूंचं भाडं आणि शेळीपालन.

 

याच हवेलीत 70 वर्षे भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबातील तरुण म्हणजे बंकी. हा बंकी अगदी तडफदार शिक्षण घेणारा. घरभाड्यासाठी मिर्झा आणि बंकीमध्ये होत असलेली भांडणं आणि दुसऱ्यावर कडी करण्यासाठी वेगळ्या क्लृप्त्या योजणारे हे दोघे या चित्रपटात उत्तम पद्धतीने दाखवले आहेत. बंकीनी अनेक महिन्यांपासून भाडं थकवल्यामुळे मिर्झा त्याला सारखी धमकी देतो, शेवटी दुचाकी पार्किंगचे वेगळे पैसे मागतो पण बंकीही खमका आहे. तो त्याला रोज नव्या कल्पना लढवून टोलवतो.

 

या सर्व प्रकारात आपण हवेली विकत असल्याची आवई मिर्झा आपल्या वकिलाकरवी उठवतो आणि सुरू होतो गोंधळ. पुरातत्त्व खात्याचा अधिकारी येतो आणि मिर्झाला सांगतो ही हवेली सरकारी संपत्ती आहे त्यामुळे सरकारच्या परवानगीशिवाय ती विकता येणार नाही. मग तर बंकीला संधीच मिळते, मग या दोघांत जी जुंपते ते सर्व चित्र प्रत्यक्षच पहायला हवं. लॉकडाउनमुळे शुजित सरकारने दिग्दर्शित केलेल्या चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर 12 जूनला अमेझॉन प्राइम व्हिडिओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवरून केला गेला आहे. लोकांना तो खूप आवडतो आहे.

‘विकी डोनर’, ‘पीकू’, ‘ऑक्टोबर’ या सारखे चित्रपट देणाऱ्या शुजितने मध्यमवर्गीयांच्या जीवनाशी जोडली जाणारी कथाच समोर मांडली आहे. त्यानी लखनौमधल्या सामान्य माणसाचं जीवनही खूप प्रभावीपणे मांडलं आहे. अमिताभ आणि आयुष्मानच्या अभिनयाचं सगळीकडे कौतुक होतंय. या चित्रपटाला टीकाकारांचांही चांगला प्रतिसाद मिळतो आहे. प्रत्यक्ष प्रेक्षक त्याला किती प्रेम देतात हे लवकरच कळेल.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *