लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक पिक्चर रिलीज झाले पण सर्वाधिक उत्सुकता अक्षय कुमारच्या लक्ष्मीची होती.

लॉकडाऊनच्या काळात ओटीटी प्लॅटफॉर्मवर अनेक पिक्चर रिलीज झाले पण सर्वाधिक उत्सुकता अक्षय कुमारच्या लक्ष्मीची होती. कारण या प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेला हा कदाचित सर्वांत मोठा पिक्चर असेल. पण जेव्हा आपण चित्रपट पाहायला लागतो तेव्हा निराशेशिवाय पदरी काहीच पडत नाही.

हा चित्रपट हॉरर-कॉमेडी या प्रकारातील आहे अशी भरपूर जाहिरात झाली पण चित्रपट पाहताना वाटतं की हा चित्रपट ना हॉरर प्रकारात येतो ना कॉमेडी. त्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन तर होत नाही. जसं आपण आपल्या प्लेलिस्टमध्ये काही गाणी लुपवर लावून ऐकतो तसे काही सिन दिग्दर्शकाने तयार केले आहेत. बुर्झ खलिफा आणि इतर गाणी लुपवर लावून चित्रपट पुढे रेटण्याचं काम चालत असतं त्यामुळे चित्रपट अधिकच रटाळ होतो.

एखादी इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्या व्यक्तीचं भूत होतं आणि एखाद्या शरीरात प्रवेश करून ती व्यक्ती आपल्या राहिलेल्या इच्छा पूर्ण करते. तशी ही संकल्पना नवी नाही. पण ज्या पद्धतीने हाताळली गेली आहे त्यावरून तर ती कल्पना अधिकच जुनाट वाटू लागते. प्रत्येक प्रसंग हा अगदीच प्रेडिक्टेबल झाला त्यात तर्क आणि वास्तवतेला पूर्णपणे फाटा देण्यात आला आहे.

राघव लॉरेन्सचा लक्ष्मी हा कांचना या तामिळ चित्रपटाचा रिमेक आहे. चित्रपटाची कथा अशी आहे की लक्ष्मी या तृतीयपंथीय व्यक्तीची एक बिल्डर हत्या करतो. त्याचा बदला घेण्यासाठी लक्ष्मीचे भूत आसिफच्या (अक्षय कुमारच्या) अंगात शिरते.

चित्रपटात कुणाचा रोल काय आहे हे सांगणं तसं मुश्किलच आहे. पण कियारा आडवाणी आणि तिचे कुटुंबीय निराळेच आहेत. अभिनयाच्या नावाखाली त्यांनी ओव्हर ॲक्टिंगच केली आहे. यामध्ये फक्त शरद केळकरने साकारलेली लक्ष्मी हेच थोडं फार कन्विंन्सिंग वाटतं पण त्यामुळे चित्रपटात आधी सगळ्यांनी केलेली पापं धुवून निघत नाहीत.

डायरेक्टर आणि अभिनेत्यांमध्ये कुठलाही ताळमेळ वाटत नाही. डायरेक्टरला मांडायचं काय आहे आणि कलाकार काय करत आहेत असा प्रश्न सारखा पडत राहतो म्हणून सर्वांना अभिनय करण्यापेक्षा आपली भूमिका जास्तीत जास्त लाउड किंवा थिएट्रिकल कशी होईल यावरच भर दिला आहे.

लेखन आणि संकलन विभागाचीही तीच बोंब आहे. सुरू होण्याआधीच आपल्या लक्षात येतं काय होणार आहे. एडिटिंगमध्येही बटबटीतपणा आहे. चित्रपटाची लांबी इतकी आहे की एखाद्याने त्यासाठी वेळ देणं हे डायरेक्टरवर उपकार करण्यासारखंच आहे.

हॉरर चित्रपट आहे म्हणून कारण नसताना लांब लचक शॉट्स, स्लो मोशनमध्ये पात्रांची हालचाल, चित्रविचित्र आवाज घुसडले आहेत. कॉमेडीचंही तसंच आहे जिथं गरज नाही तिथे पेरणी केल्यामुळे इरिटेशन होतं.

चित्रपटामध्ये जेव्हा अक्षय कुमारच्या अंगात भूत शिरतं तेव्हा त्याचे कुटुंबीय ते जाण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. दुर्दैवाने प्रेक्षकांकडे हा पिक्चर सहन करण्यापलीकडे काही उपाय उरत नाही.

या चित्रपटाची भीती फक्त एकदाच वाटली. शेवटच्या सीनमध्ये कळतं की चित्रपटाचा सिक्वेल येण्याची शक्यता आहे. तेव्हाच भीतीने पोटात गोळा उठला.

थोडक्यात हा चित्रपट पाहिला नाही तर तुमचं कुठलंच नुकसान होणार नाही. काही पाहायचंच असेल तर महेश कोठारेंचा ‘पछाडलेला’ पुन्हा एकदा पाहा निदान त्यात दिलीप प्रभावळकर आणि भरत जाधवच्या चांगल्या भूमिका तरी आहेत. बाबा लगीन…पण आहे. मग उगंच हा पिक्चर पाहून डोक्याला ताप कशाला ओढवून घ्यायचा.

  • पंकज कुलकर्णी