चित्रपट दिग्दर्शनाबरोबरच अनुराग बसूने सिनेमॅटोग्राफीदेखील केली आहे. आणि कॅमेऱ्याचा वापर कल्पकतेनी करून चित्रपट वेगवान बनवला आहे.

जीवनात फक्त एकच अंतिम सत्य आहे ते म्हणजे मृत्यू असं या चित्रपटाचा निवेदक म्हणतो. तसं चित्रपटसृष्टीत एक वास्तव आहे ते म्हणजे अनुराग बसूचे चित्रपट धाडसी असतात.

मूक चित्रपटाची ट्रीटमेंट असलेला बर्फी असो वा म्यूझिकल कॉमेडी जग्गा जासूस असं अनुराग बसूने प्रयोग करणं थांबवलेलं नाही. कधी हे प्रयोग सफल होतात तर कधी ते प्रेक्षकांना तितके रुचत नाहीत पण नवं काहीतरी पाहायला मिळाल्याचा आनंद त्याचे चित्रपट देऊन जातात तसाच हा पिक्चर आहे.

लहानपणी तुम्ही लुडो खेळला असेल. आता तर तो ऑनलाइनही खेळता येतो म्हणा. लुडोची गंमत ही असते की या खेळात प्रचंड अनिश्चतता असते. या डावाला जिंकणारा माणूस पुढच्या डावाला हरू शकतो. किंवा उलटही होऊ शकतं. आपण इतर खेळाडूंशी स्पर्धा करतो आणि सर्वांचं उद्दिष्ट एकाच ठिकाणी पोहचणं हे असतं. हे रुपक वापरून चित्रपटाची कथा आकार घेते.

या चित्रपटात चार कथा आहेत आणि जसे लुडोत चार रंग असतात त्याच प्रमाणे रंगांचा वापर कथेसाठी करण्यात आला आहे असं आपल्याला दिसतं. त्यामुळे चित्रपटाला एक फ्रेश लुक तर आलाच आहे त्याच बरोबर कथाही पुढे जाण्यास त्यामुळे मदत होते. जसं सर्व सोंगट्या पुढे जाण्यासाठी फासे टाकावे लागतात तसेच फासे टाकणारी एक व्यक्ती आहे ती म्हणजे सत्तू भय्या ( पंकज त्रिपाठी) सॅकरेड गेममधील गुरुजी, मिर्झापूरमधील कालीन भय्या या व्यक्तीरेखांची अजून क्रेझ संपलेली नाही. त्याच वेळी पंकज त्रिपाठी नवीन पिक्चरमध्ये झळकला आहे.

त्याच्याकडे काम करणारा बिट्टू (अभिषेक बच्चन) एका सहा वर्षाच्या मुलीला किडनॅप करतो आणि पुढे एक एक गोष्टी घडत जातात. दुसरी एक कथा आहे ज्यामध्ये वेगळे झालेले प्रेमी युगल पुन्हा एकत्र येतात आणि त्यांच्या एकत्र येण्याचं कारणही जरा वेगळं आहे. अशा आणखी दोन कथा या चित्रपटात आहेत. क्लायमॅक्सला चारी कथा एकत्र येतात.

चित्रपटाची विशेषता म्हणजे यातील पात्रं हीच आहे. प्रत्येकाने आपल्या व्यक्तिरेखेला साजेसा अभिनय केला आहे. पंकज त्रिपाठी आणि राज कुमार राव यांचं काम उल्लेखनीय आहे.

जसं मुन्नाभाई एमबीबीएसमध्ये बोमन इराणी टेंशन आल्यावर हसतो त्याचप्रमाणे राज कुमार राव टेंशन आलं की मिथुन चक्रवर्तीसारखा डान्स करत असतो.

चित्रपटाचं कथानक पुढे नेण्यासाठी गाण्याचा वापर अतिशय सुंदररीत्या करण्यात आला आहे. १९५२ ला आलेल्या अलबेला चित्रपटातलं किस्मत की हवा कभी गरम कभी नरम हे गाणं चारी कथांना एकत्र बांधणारा धागा बनलं आहे. जुन्या गाण्याचा प्रसंगानुरुप चपखलपणे वापर करण्यात आला आहे.

चित्रपट दिग्दर्शनाबरोबरच अनुराग बसूने सिनेमॅटोग्राफीदेखील केली आहे. आणि कॅमेऱ्याचा वापर कल्पकतेनी करून चित्रपट वेगवान बनवला आहे. शेवटीला काही काळासाठी चित्रपट लांबल्यासारखा होतो. तेच सिन पुन्हा पुन्हा होत आहेत असं वाटतं. पण चित्रपटाचा शेवट समाधानकारक असल्यामुळे प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटतं.

अनुराग बसू निवेदक देखील आहे. पाप-पुण्य आणि धर्माच्या गोष्टीदेखील तो सहज सर्वांना समजतील अशा भाषेत उलगडून सांगतो. आपण केलेल्या कृत्याची परतफेड आपल्याला कशी करावी लागते हे सुद्धा तो मनोरंजक पद्धतीने सांगतो.

जसं आपल्या मित्र परिवारासोबत किंवा कुटुंबीयांसोबत लुडो खेळल्यावर आपला वेळ चांगला गेला असं आपण म्हणतो तशीच फीलिंग हा चित्रपट पाहिल्यावर मिळते. त्यामुळे ऐन दिवाळीत निखळ मनोरंजन करणारा एक चित्रपट आल्याचा फायदा नक्कीच सर्वांना होईल.

  • पंकज कुलकर्णी