‘बागी’ या मालिकेतील हा तिसरा सिनेमा. हँडसम हंक, सिक्स पॅक्ड बॉडीचं दर्शन घडवणारा टायगर श्रॉफ आणि त्याची ॲक्शन (थोडी अतीच), सख्या भावासाठी त्याने दहशतवाद्याशी घेतलेल्या वैराचा परिणाम म्हणजे ‘बागी-3.’ अहमद खानने सर्व मसाला टाकून रंजक बनवण्याचा प्रयत्न केला आहे पण ॲक्शनचा मसाला जरा अतीच झाल्यामुळे एकूण चित्रपटाची चव बिघडते.

 कथा अशी, आगरा शहरातील पोलीस इन्स्पेक्टर चरण चतुर्वेदी (जॅकी श्रॉफ) यांना दोन मुलं आहेत. रॉनी (टायगर श्रॉफ) आणि विक्रम (रितेश देशमुख). रॉनी हँडसम, बलदंड शरीरयष्टीचा धडाकेबाज तरूण, आणि विक्रम शामळू. चरण चतुर्वेदींचा एका अपघातात मृत्यू होतो. मोठा भाऊ विक्रमला आयुष्यभर सांभाळायचं वचन चरण आपला लहान मुलगा रॉनीकडून घेतात. रॉनी हे वचन पाळण्यासाठी जेव्हा जेव्हा विक्रम अडचणींत सापडतो तेव्हा प्रकट होऊन त्याला मदत करतो.

 नंतर विक्रमला पोलिसांत नोकरी लागते तेव्हाही विक्रमला मारायला आलेल्या गुंडांची रॉनी धुलाई करतो आणि त्यांना वाचवतो. आयपीएल नावाचा गँगस्टर भारतातल्या कुटुंबांचं अपहरण करून  सीरियला त्यांची तस्करी करत असल्याचं विक्रमला लक्षात येतं. विक्रम रॉनीच्या मदतीनी आयपीएलच्या तावडीतून एका कुटुंबाची सुटका करतो.

 विक्रमचं कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी म्हणून नाव होतं. त्यामुळे त्याला सीरियात एका असाइनमेंटसाठी सरकार पाठवतं. पण सीरियात गेल्यावर विक्रमचा आधीचा शत्रू आयपीएलभाई सीरियातील दहशतवादी गटाचा म्होरक्या अबू जलालाकरवी विक्रमचं अपहरण करतो. त्याला सोडवण्यासाठी रॉनी सीरियात दाखल होतो आणि मग पुढे काय होतं?, रॉनी एकटा दहशतवाद्यांच्या संघटनेशी लढू शकतो का? भाऊ विक्रमला वाचवतो का? याची उत्तरं तुम्हाला पडद्यावर सिनेमा पाहताना मिळू शकतील.  रॉनीची गर्लफ्रेंड आणि विक्रमची मेव्हणी सिया (श्रद्धा कपूर), विक्रमची बायको रूची (अंकिता लोखंडे) यांच्या भूमिका ठीकठाक झाल्या आहेत. अबू जलाल गाझा (जमील खौरे), आयपीएल भाई (जयदीप अहलावत), अख्तर लाहौरी (विजय वर्मा) यांनीही आपल्या भूमिका चांगल्या वठवल्या आहेत. पण एकूणात विचार करता बागी -2 सारखा ॲक्शनपट देणाऱ्या अहमद खानला या वेळी ती किमया साधता आलेली नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *