आत्मभान जागृत करणारा थप्पाड.

भारतीय समाजातील चुकीच्या रूढी,परंपरांवर अचूकपणे बोट ठेऊन ज्यांवर उघडपणे चर्चाच होत नाही, असे विषय मांडण्याचा दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांचा आणखी एक वाखाणण्याजोगा प्रयत्न म्हणजे ‘थप्पड’. समाजाच्या उच्चभ्रु, उच्चशिक्षित, सधन घरांमध्येही हिंसाचार होतो; पण त्याला वाचा फुटत नाही आणि उघडपणे बोललंही जात नाही. ही हिंसा म्हणजे नवरा-बायकोच्या प्रेमाचाच भाग असल्याचं समजाने गृहित धरलंय.

 ‘थप्पड’ची नायिका अमृताच्या निमित्ताने सिन्हा यांनी घरगुती हिंसाचाराला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला आहे. या विषयाचे विविध कंगोरे चित्रपटात मांडले असल्यामुळे या ‘नाजूक’ विषयावर पुन्हा एकदा विचार करण्यास हा चित्रपट प्रेक्षकाला भाग पाडतो. अमृता (तापसी पन्नू)  आणि विक्रम (पवैल गुलाटी) हे अरेंज्ड मॅरेज केलेलं आनंदात जगणारं जोडपं. अमृता, नृत्यांगना, सुशिक्षित आणि लग्नानंतर नवऱ्याचीच स्वप्न आपली समजून त्याला वाहून घेणारी पत्नी. विक्रम, प्रचंड करिअरिस्ट, ध्येयवेडा कॉर्पोरेट प्रोफेशनल. नवनवी कॉर्पोरेट आव्हानं स्वीकारणं आणि ती कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करण्याची नशा असलेला विक्रम.

 विक्रमचंच कॉर्पोरेट यश साजरं करण्यासाठी एक पार्टी दिली जाते. सगळं सुरळीत चालू असताना ऑफिसमधल्या राजकारणाचा आलेला राग काढण्यासाठी विक्रम अचानकपणे अमृताला थोबाडीत मारतो. सर्वांसमोर थोबाडीत बसल्यामुळे विक्रमसाठी सर्वस्व ओवाळून टाकणाऱ्या अमृताच्या मनाला खूप खोलवर इजा होते आणि तिचं आत्मभान जागं होतं. नवऱ्याने जाहीरपणे अपमान करत अंगावर हात उचलल्यामुळे विक्रमपासून घटस्फोट घेण्याचा निर्णय अमृता घेते.

 ‘नवऱ्यानी थोबाडीत मारली म्हणून कुणी घटस्फोट घेतं का,’ ‘लग्नात सगळं चालतं,’ ‘घटस्फोट घेतलास तर लोक काय म्हणतील,’ असे अनेक परंपरागत विचार अमृताला पटवून देण्याचा प्रयत्न तिची आई (रत्ना पाठक-शहा), सासू (तन्वी आझमी) आणि सगळेच करतात. पण स्वत्वाची खोलवर जाणीव जागृत झालेली अमृता आपल्या निर्णयावर ठाम राहते. तिचे वडिल (कुमुद मिश्रा) तिला पाठिंबा देतात, असं या चित्रपटाचं कथानक.  अनुभव सिन्हा आणि मृण्मयी लागू यांनी चित्रपटाची पटकथा उत्तम लिहिली आहे, सामान्य मध्यमवर्गीय घरांत घडणाऱ्या घटना, चर्चा यातील बारकावे त्यांनी अचूक टिपले आहेत. अनुराग सैकिया यांनी दिलेलं संगीत कथेला साजेसं आहे. नवऱ्यानी पहिल्यांदाच थोबाडीत मारल्यामुळे पत्नीच्या आत्मभानाला येणारी जागृती आणि तिच्या ठाम भूमिकेमुळे त्याच्या अहंकाराचा चुराडा करणारी ही कथा एकदा चित्रपटगृहांत पहायला हवी अशीच आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *