सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकाला चेकमेट करण्याच्या अनेक कथा आपण पाहिल्या आहेत. परंतु, एकाच कुटुंबातील सगळेच गडी जेव्हा शड्डू ठोकून एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा सत्तासंघर्षाची सर्वच समीकरणं बदलून जातात.

आत्तापर्यंत सत्तासंघर्ष असलेले अनेक सिनेमा मराठीत येऊन गेलेत त्यात सत्ताधारी आणि विरोधक असा थेट सामना पहायला मिळत होता. सत्तेच्या हव्यासापोटी एकमेकाला चेकमेट करण्याच्या अनेक कथा आपण पाहिल्या आहेत. परंतु, एकाच कुटुंबातील सगळेच गडी जेव्हा शड्डू ठोकून एकमेकांसमोर उभे ठाकतात तेव्हा सत्तासंघर्षाची सर्वच समीकरणं बदलून जातात.

नेमका हाच धागा पकडून लेखक क्षितिज पटवर्धन आणि दिग्दर्शक समीर विद्वंस जोडीने हे सत्तानाट्य अत्यंत रंजक पद्धतीने ‘धुरळा’ सिनेमामध्ये मांडला आहे. याचं जोडीने २०१३ साली ‘सगळेच उभे आहेत’ हे नाटक रंगभूमीवर आणले होते. पण त्याला रसिकांचा अत्यल्प प्रतिसाद मिळाल्याने त्यांना ते लवकरच गुंडाळावे लागले. परंतु तेच कथाबीज घेऊन त्याचे रूपांतर एका नाट्यमय वटवृक्षात करण्यात या जोडीला यश आले आहे, असेल म्हटले तर वावगं ठरणार नाही.

सिनेमाचं कथानक सुरु होते ते आंबेगावात जिथे गेली कित्येक वर्षे बिनविरोध निवडून येत असलेले सरपंच निवृत्तीनाथ उर्फ अण्णा उभे यांचं निधन होतं आणि त्यांचा मोठा मुलगा नवनाथ उभे उर्फ दादा (अंकुश चौधरी) हा वारसदार म्हणून आपणच सरपंच होणार या अविर्भावात पुढची वाटचाल सुरु करतो. परंतु, नियतीला काही वेगळेच मंजूर असतं आणि अण्णा उभेंची पत्नी (अलका कुबल), तीन मुलं आणि दोन सुना यांच्यात सत्तासंघर्ष पेटतो.

त्यात अण्णा उभेंच्या वर्चस्वामुळे अनेक वर्ष सत्तेपासून दूर असलेली मंडळीही आता उभेंना मागे सारून सत्तेच्या स्पर्धेत उतरतात. त्यातच दादाची बायको बुरगुंडा (सई ताम्हणकर), शरीराने बळकट पण हळवा असलेला दादाचा भाऊ हणमंता (सिध्दार्थ जाधव), हणमंताची बायको या सत्ता संघर्षात आपणही आहोत, असं भासवणारी मोनिका (सोनाली कुलकर्णी) आणि अतिमहत्वाकांक्षी सर्वात लहान भाऊ असणारा भावज्या (अमेय वाघ) हे देखील सरपंचपदाच्या शर्यतीत सामील होतात. एकाच कुटुंबातील ही सर्व मंडळी सत्तेच्या हव्यासापायी एकमेकांवर कुरघोड्या करण्याची संधी शोधतच असतात. या संपूर्ण संघर्षातून अखेर खुर्ची कोणाला मिळते हे पाहणे उत्कंठावर्धक आहे. अप्रतिम कथानक, उत्कृष्ट संवाद आणि दिग्दर्शनामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीला उतरेल यात शंकाच नाही.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *