सोनी लाइव्हवर पाहिलेल्या ‘राम सिंह चार्ली’ या चित्रपटाने माझ्या लहानपणीच्या आठवणींची उजळणी केली.

मनोरंजन म्हटलं की माझ्या डोळ्यासमोर लहानपणीच्या दोन गोष्टी तरळतात. एक म्हणजे उन्हाळाच्या सुट्टीत ग्रॅंड सर्कस पाहणं आणि दुसरी म्हणजे चार्ली चॅप्लिनचा दूरदर्शनवर लागलेला सिनेमा पाहणं.

सोनी लाइव्हवर पाहिलेल्या ‘राम सिंह चार्ली’ या चित्रपटाने माझ्या लहानपणीच्या आठवणींची उजळणी केली. राम सिंह (कुमुद मिश्रा) सर्कसमध्ये काम करणारा कलाकार आहे. त्याची खासियत म्हणजे तो चार्ली चॅप्लिनसारखं काम करतो.

राम सिंहचा चार्लीचा अभिनय इतका जिवंत आहे की चित्रपटातलं दुसरं पात्र म्हणतं, ‘इनसे बेहतर चार्ली काम सिर्फ एक ही आदमी कर सकता है और वो है खुद चार्ली चॅप्लिन.’

दुर्दैवाने चार्लीची सर्कस आता बंद होणार आहे आणि एकदा का ही सर्कस बंद झाली तर आयुष्य नावाच्या मोठ्या सर्कशीत त्याला त्याचं जगण्यासाठीचं कसब दाखवावं लागणार आहे.

सर्कस बंद झाल्यावर राम सिंहची दोन वेळच्या जेवणासाठीची धडपड सुरू होते. त्याची पत्नी ( दिव्या दत्ता) गरोदर आहे. म्हणजे लवकरच तिघा जणांची जबाबदारी त्याच्या खांद्यावर येऊन पडणार आहे. कोलकात्यामध्ये तो हाती पडेल ते काम घेऊन त्याची गुजराण करत आहे. त्याच वेळी तो इतर सर्कसमध्येही काम शोधत आहे. पण त्याला सर्कशीत काम मिळत नाही.

मग तो एक स्वप्न उराशी धरतो. स्वतःची सर्कस सुरू करण्याचं. अर्थात हा रस्ता देखील काही सोपा नाही. खूप सारी आव्हानं त्यात आहेत. त्याचं स्वप्न प्रत्यक्षात उतरतं की नाही हे चित्रपटातच पाहणं योग्य ठरेल. आपण याआधी कुमुद मिश्राला सहायक अभिनेत्याच्या भूमिकेत पाहिलं आहे. पहिल्यांदाच तो प्रमुख भूमिकेत आला आहे.

आपलं घर चालवण्यासाठी तो एकदा रिक्षा चालकाचेही काम करतो. या दृश्यावेळी त्याने दिलेले हावभाव पाहिले की बलराज साहनींच्या ‘दो बिघा जमीन’ची आठवण येते. रिक्षा चालवताना देखील त्याच्या डोक्यात फक्त सर्कशीचेच विचार येत असतात.

चार्ली हाडाचा कलाकार आहे. तो आपल्या मुलाला शिकवतो की खरा कलाकार इतरांसाठी नाही स्वतःसाठी काम करत असतो. स्वतःच्या चेहऱ्यावर रंग लावून जेव्हा चार्ली बनतो तेव्हा तो राम सिंह नसतोच, तो पूर्णपणे चार्लीच्याच रंगात मिसळला आहे असा भास आपल्याला होतो.

राम सिंहच्या आयुष्याला दोन बाजू आहेत. तो हास्य कलाकार आहे पण त्याचवेळी त्याच्या जीवनात हास्य आणि सुख नाहीये. अशा परिस्थितीमध्ये आपल्या कुटुंबाला दुःखद प्रसंगात हसवण्याची त्याची धडपड तो आपल्यापर्यंत पोहोचवतो. यातूनच आपल्या लक्षात येतं की कुमुद मिश्रा अभिनेता म्हणून किती सक्षम आहे.

कुमुद मिश्रा व्यतिरिक्त इतर व्यक्तिरेखांना फारसा स्कोप नाहीये. त्यांचा अभिनय चांगला आहे पण स्क्रीन टाइम कमी आहे. दिव्या दत्ताने त्याच्या पत्नीची भूमिका चोख बजावली आहे. तिच्या वाट्याला संवाद कमी आहेत पण तिचे डोळे अत्यंत बोलके आहेत. त्यातूनच ती आपल्या भावना प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते.

सिनेमाचं चित्रीकरण अतिशय सुंदर आहे. आपण कोलकाता अनेक चित्रपटांमधून पाहिलं आहे पण या वेळी सिनेमॅटोग्राफर सुभ्रांशू दासने यापूर्वी स्क्रीनवर न पाहिलेल्या कोलकाताची सफर प्रेक्षकांना घडवली आहे.

‘लक्ष्मी बॉम्ब’ चित्रपटाचे नाव बदला, हिंदू सेनेची मागणी; हिंदुंच्या देवीचा अपमान केल्याचा आरोप करीत दिली ‘ही’ धमकी 

चित्रपट आणि कलाकारांचा उद्देश उदात्त असला तरी साधारण पटकथेमुळे योग्य तो परिणाम साधला जात नाही ही या चित्रपटाची कमकुवत बाजू आहे. पण कुमुद मिश्राच्या अभिनयाने या चित्रपटाला तारलं आहे.

त्याच्या सशक्त अभिनयासाठी हा चित्रपट आपण नक्कीच पाहू शकतो. ज्या प्रमाणे सर्कशीचा तंबू एका मोठ्या खांबाच्या आधारावर असतो अगदी तसाच हा चित्रपट कुमुद मिश्राने आपल्या खांद्यावर पेलला आहे.

राम सिंह चार्ली आपल्याला विचार करण्यासाठी भाग पाडतो. ज्या कलाकारांना काही कारणामुळे आपली कला सोडावी लागली आहे, ज्यांचे रोजगार गेले आहेत त्यांचं आयुष्य कसं चालतं. एका कौशल्यात तुम्ही तरबेज आहात पण ते सादर करता न आल्यामुळे त्या व्यक्तीची कशी घुसमट होत असेल असा विचार आपल्या डोक्यात आल्याशिवाय राहत नाही.

  • पंकज कुलकर्णी