प्रेमाला वय, जात, धर्म, पंथ यांचं बंधन नसतं असं म्हटलं जातं, पण दोन भिन्न आर्थिक स्तरातील व्यक्तींमध्ये प्रेम झालं तर? जितका अधिक संघर्ष तितकंच प्रेम उमलतं याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना येतो.

प्रेमाला वय, जात, धर्म, पंथ यांचं बंधन नसतं असं म्हटलं जातं, पण दोन भिन्न आर्थिक स्तरातील व्यक्तींमध्ये प्रेम झालं तर? जितका अधिक संघर्ष तितकंच प्रेम उमलतं याचा प्रत्यय हा चित्रपट पाहताना येतो.

रत्ना (तिलोत्तमा शोम) ही हाऊसहेल्प आहे. मुंबईतील एका पॉश एरिआत असलेल्या अश्विनच्या (विवेक गोंबर) घरातच ती राहते आणि त्याचं सर्व काम करत असते. अश्विन हा अमेरिकेत शिकून परत आला आहे. त्याचे वडील बिल्डर आहेत आणि अश्विन त्यांना त्यांच्या कामात मदत करतो. त्याचे आई-वडील त्याच शहरात राहतात पण तो स्वतंत्र राहतो.

रत्ना तिच्या कामात इतकी सरावलेली आहे की अश्विन म्हणजेच तिचे ‘सर’ यांना काय हवं नको हे तिला न सांगता देखील कळतं. पण गोष्टी तेव्हा बदलतात जेव्हा अश्विन रत्नाच्या प्रेमात पडतो. प्रेम या विषयावर हजारो काव्य, कथा, कादंबऱ्या आणि पुस्तकं येऊन गेली आहेत पण या चित्रपटाचा विषय आणि मांडणी ताजी वाटते.

अश्विनचं लग्न अचानक मोडल्यामुळे रत्नाची सुट्टी कॅन्सल होते आणि तिला परत तिच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच मुंबईला जॉइन व्हावं लागतं. काही दिवसताच तो पुन्हा कामावर जायला लागतो आणि रत्ना अगदी पूर्वीप्रमाणेच घरकामाची जबाबदारी पार पाडू लागते.

अश्विनने काही वर्षे अमेरिकेतच लेखक म्हणून काढलेली असतात पण घरच्या जबाबदाऱ्यांमुळे त्याला परत भारतात यावं लागतं. तो नम्र आणि संवेदनशील आहे पण लग्न मोडल्यामुळे तो कमालीचा अस्वस्थ आहे. विवेक गोंबरने आपली व्यक्तिरेखा योग्यरीत्या पार पाडली आहे.

रत्ना ही खेड्यातली मुलगी आहे. १९ व्या वर्षीच ती विधवा झाली आहे. सगळे जण तिला म्हणत असतात की तू इथेच राहा पण तिला त्यांच्यावर अवलंबून राहायचं नाही. त्यामुळेच ती मुंबईत येऊन घरकाम करण्याचा निर्णय घेते.

गावातून मुंबईत येण्यासाठी तिला करावे लागणारे प्रयत्न हे तिच्या आयुष्याबाबत बरंच काही सांगून जाताना दिसतात. ती कठीण परिस्थितीवर मात करण्यासाठी कशी धडपड करते हे प्रतिकात्मकरीत्या या दृश्यातून दाखवले आहे. आयुष्यभर केवळ हेच काम करायचे नाही तर फॅशन डिजायनर होण्याचे तिचे स्वप्न आहे.

तिलोत्तमा शोमने उत्कृष्टरीत्या आपली भूमिका साकारली आहे. तिचे हावभाव, देहबोली, भाषा उच्चार हे सारं काही पाहिलं की कळतं की ती भूमिकेत किती शिरली आहे.

दोन भिन्न वर्गातून आलेले लोक प्रेमात कसे पडतात हे दाखवणं धाडसी आहे. त्याच प्रकारे ते नात्यांकडे कसे पाहतात हे देखील उत्तमरीत्या चितारण्यात आले आहे. कॅमेऱ्याचा वापर कथा पुढे नेण्यासाठी करण्यात आला आहे. त्यांच्यामध्ये असलेले अंतर दाखवण्यासाठी कॅमेरा आणि स्पेसचा कलात्मकतेने वापर करण्यात आला आहे.

चित्रपटात अगदी मोजकेच संवाद आहे. दोन महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखांमधील संभाषण फक्त हो, नाही, थॅंक्यू आणि सॉरी या शब्दांवरच आहे तरी पण ते खूप काही सांगून जाण्यासारखं आहे. फक्त संभाषण नाही तर शांततेचा वापर देखील सुंदररीत्या करण्यात आला आहे.

पार्श्वसंगीतासाठी बासरीचा वापर करण्यात आला आहे. लाइफ ऑफ पाय या चित्रपटानंतर एखाद्या चित्रपटात पार्श्वसंगीतासाठी बासरीचे समधुर स्वर वापरण्यात आल्याचं निदान माझ्या तरी लक्षात नाहीये.

जेव्हा आपण चित्रपट पाहतो तेव्हा आपल्याला कळतं की ते एकमेकांच्या प्रेमात का पडले आहेत. अश्विनला असं कुणीतरी पाहिजे असतं की ज्या व्यक्तीवर तो विश्वास ठेऊ शकेल आणि तिला असं कुणी हवं आहे की जो तिचा आणि तिच्या स्वप्नांचा आदर करेल.

शेवटचा सीन तर भारावून टाकणाराच आहे. वेळ, जागा, संवाद सर्वच बाबतीत शेवटचा सीन कमाल बनला आहे. दोन शब्दांचा सहारा घेऊन एखाद्या चित्रपटाला क्लायमॅक्स देता येऊ शकतो हेच या चित्रपटाने दाखवलं आहे.

  • पंकज कुलकर्णी