दियाला मुलगा होणार की मुलगी होणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना बऱ्याच दिवसापासून होती. १४ मे रोजी दीयाने या गोंडस मुलाला जन्म दिला.

रेहना है तेरे दिल मे फेम दिया मिर्झा ही अभिनेत्री नुकतीच बिझनेस मॅन वैभव रेखीसोबत विवाहबद्ध झाली. लग्नानंतर काही दिवसांतच तिने आपली प्रेग्नन्सीची बातमी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे जाहीर केली हाेती. दियाला मुलगा होणार की मुलगी होणार याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना बऱ्याच दिवसापासून होती. पण आता ही उत्सुकता संपलेली आहे. कारण दियाने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून आपल्याला मुलगा झाल्याचे  चाहत्यांना कळवले.

१४ मे रोजी दियाने या गोंडस मुलाला जन्म दिला. पण प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाल्यामुळे तिने ही बातमी आजवर आपल्या चाहत्यांना सांगितली नव्हती. प्रीमॅच्युअर बेबी असल्यामुळे नवजात बाळाची तब्येत अतिशय नाजूक होती. तिच्या मुलाला आयसीयूमध्ये स्पेशल केअर ट्रीटमेंट दिली जात होती. डॉक्टर आणि नर्सेस यांनी आपल्या मुलासाठी केलेल्या अथक परिश्रमासाठी तिने आपल्या या पोस्टद्वारे आभार मानले आहेत. त्याचप्रमाणे दिया म्हणते की, माझ्यासाठी आणि वैभवसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे की लवकरच आमचं बाळ आयसीयू मधून घरी येत आहे. आम्ही आमच्या मुलाकडे जेव्हा जेव्हा पाहतो तेव्हा तेव्हा आम्हाला ब्रह्मांडाचे आभार मानावे वाटतात. इतक्या प्रेमळ शब्दांत तिने ही बातमी आपल्या चाहत्यांना कळवली आहे.

अवयान आझाद रेखी असे तिने आपल्या मुलाचे नाव ठेवले आहे. इन्स्टाग्रामवर मुलाचा हातात हात घेतलेला फोटो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे. २०१४ मध्ये दियाने साहिल संघा सोबत लग्न केले होते. पण हे लग्न जास्त काळ टिकू शकले नाही. मागे दोघांनी आपण वेगळे होत आहोत हे एका म्युच्युअल स्टेटमेंट द्वारे आपल्या चाहत्यांना सांगितले होते. २०२१ मध्ये दियाने वैभव रेखी याच्यासोबत लग्न केले होते.