Kangana ranaut joined koo : कू या शॉर्ट मेसेजिंग सोशल मीडिया ॲपचे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्णन यांनी अधिकृतपणे पोस्ट करून कू ॲपवर कंगनाचे स्वागत केले. (फोटो इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

आपल्या सशक्त अभिनयाबरोबर वादग्रस्त आणि टोकाची मतं व्यक्त करणारी अभिनेत्री कंगना राणावत सध्या चर्चेत आहे. मंगळवारीच कंगना राणावतचे अधिकृत ट्विटर हँडल कंपनीकडून कायमस्वरुपी स्थगित करण्यात आले. त्यानंतर या विषयावरून देशभर चर्चेला सुरुवात झाली. काही जणांनी ट्विटर कंपनीच्या या निर्णयाचे स्वागत केले तर काही जणांनी याला तीव्र विरोध केला. पण कंगना राणावतने आता या विषयावर फारसा वेळ न घालवता पुढचे पाऊल टाकले आहे. कंगनाने आता कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपले नवे अकाऊंट सुरू केले आहे.

कू या शॉर्ट मेसेजिंग सोशल मीडिया ॲपचे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्णन यांनी अधिकृतपणे पोस्ट करून कू ॲपवर कंगनाचे स्वागत केले. कू ॲपवरील आपल्या पहिल्या पोस्टमध्ये कंगनाने म्हटले आहे की, व्यक्त होण्यासाठी ही नवीन जागा आहे. त्यामुळे रुळायला थोडा वेळ लागेल. पण भाड्याचं घर हे भाड्याचंच असतं. आपलं घर कसंही असो ते आपलंच असतं, असे तिने आपल्या पहिल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर तिथे झालेल्या हिंसाचारावरून कंगना राणावत हिने प्रक्षोभक भाषेत ट्विट केले होते. याआधीही तिने काही वेळा टोकाची मते मांडणारी ट्विट्स केली होती. पण बंगालमधील हिंसाचाराप्रकरणी केलेल्या ट्विटनंतर कंगनाचे ट्विटर हँडल मंगळवारी कायमस्वरुपी स्थगित करण्यात आले. ट्विटरच्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

कू हे ट्विटरच्या धर्तीवर तयार करण्यात आले शॉर्ट मेसेजिंग ॲप आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक जण कू ॲपवर सक्रिय व्हायला लागले आहेत. अनेक पत्रकार, काही सेलिब्रिटी या ॲपवर व्यक्त व्हायला लागले आहेत.