जोरात चित्कारत पर्यटकांच्या वाहनाचा पाठलाग करणाऱ्या हत्तीचा व्हिडीओ झाला व्हायरल / फोटो ट्विटरवरून साभार

सोशल मीडियावर सतत काही ना काही ट्रेंडिंग विषय असतो. आताही एक व्हिडीओ ट्विटरवर खूपच व्हायरल झाला आहे. भारतीय वन सेवेचे अधिकारी सुरेंद्र मेहरा यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून अंगावर काटा आणणारा आणि क्षणभर धडकी भरवणारा हा व्हिडीओ ट्विटरवर ट्रेंडिंग आहे. यात एक हत्ती मोठमोठ्याने चित्कारत पर्यटकांच्या वाहनाच्या दिशेने धावत येताना दिसतो. व्हिडीओमघ्ये एका व्यक्तीने, ‘अरे काही होणार नाही, तू व्हिडीओ बनव’ असे म्हटलेले ऐकायला मिळते. काही होणार नाही (कुछ नही होगा) हेच शब्द वापरून हा व्हिडीओ ट्रेंडिंग होत आहे.

व्हिडीओमध्ये महिला आणि पुरुष पर्यटकांचे आवाज ऐकू येतात. त्यामध्ये महिला पर्यटक म्हणते, ‘अरे काही होत नाही, शांत रहा’. तर, दुसरा एक पर्यटक हत्तीला आपल्या वाहनाकडे येण्यासाठी प्रवृत्त करतो. लवकरच हत्ती गती वाढवतो आणि पळतच त्यांच्या वाहनाकडे येऊ लागतो. त्यावेळी अन्य एक पर्यटक वाहन जोरात पळवायला सांगतो. त्यानंतरही हत्ती जोरात चित्कारत पळत त्यांच्या वाहनाचा पाठलाग करू लागतो.

हा व्हिडीओ नेमका कोणत्या ठिकाणचा आहे हे जरी स्पष्ट होऊ शकलेले नसले तरी मायक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर अपलोड केला गेलेला हा व्हिडीओ सहा हजारहून अधिकवेळा पाहिला गेला आहे. त्याबरोबरच या व्हिडीओवर खूप साऱ्या प्रतिक्रियाही देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये पर्यटकांचा व्यवहार बेजबाबदारपणाचा असल्याची टीका अनेकांनी केली तर काहींनी जंगली प्राण्यांना चिथावण्यावरून पर्यटकांचा निषेध केला. सुरेंद्र मेहरा यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करताना, सर्वांनी जंगली प्राण्यांचा सन्मान करावा, असा सल्ला दिला.

वरिष्ठ आयएफएस अधिकारी रमेश पांडे यांनी, पर्यटकांना हत्तींपासून सुरक्षित अंतर राखण्याचा सल्ला दिला. व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना त्यांनी ट्वीट केले, ‘अशा घटनांमुळे जीवाला धोका होऊ शकतो. हत्ती नक्कीच खूप जोरात पळू शकतो आणि अशा प्रकारच्या चालणाऱ्या वाहनांपर्यंत सहजपणे पोहोचू शकतो. नेहमी सल्ला दिला जातो की सुरक्षीत अंतर ठेवा आणि जंगली प्राण्यांचा फायदा घेऊ नका.’

आयएएस अधिकारी सुप्रिया साहू यांनीही, ‘या घटनेने एका दुःखद वास्तवतेचे दर्शन घडवले’, अशी प्रतिक्रिया दिली. लहान मुलांना वन्यप्राण्यांच्या सन्मानाबाबतचे शिक्षण देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी मांडले. जंगलांचे क्षेत्र कमी होत असून जंगलांमध्ये वाढणाऱ्या अतिक्रमणांमुळे मनुष्य आणि हत्ती यांच्यातील संघर्ष वाढताना पाहायला मिळत आहे. हत्तीशी झालेल्या चकमकीत दरवर्षी 400 हून अधिक माणसांना प्राण गमवावे लागत आहेत, अशी माहिती वाईल्डलाइफ ट्रस्ट ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आली आहे.

kuch nahi hoga say tourists right before elephant charges at their car