अभिनेता उमेश कामतने आपल्या इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया अकाऊंटवर या चॅनेलविरुद्ध बेजबाबदार पत्रकारितेचा आरोप केला आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा याच्या प्रकरणात विनाकारण काही माध्यमांनी मराठी अभिनेता उमेश कामत याला ओढल्याने त्याने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर अशी बेजबाबदार पत्रकारिता करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे आपल्या ट्विटर हँडलवरून जाहीर केले आहे. त्याने आपल्या हँडलवर या संदर्भात सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

राज कुंद्राचा जवळचा मित्र उमेश कामत आणि मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार उमेश कामत हे दोन वेगवेगळे व्यक्ती नसून एकच आहे, असा समज आहे काही न्यूज चॅनेल्सनी करून घेतला. त्यामुळे अभिनेता उमेश कामतचा फोटो वापरून त्यांनी ही बातमी आपल्या चॅनेलवर दाखवली. याबाबत अभिनेता उमेश कामतने आपल्या इन्स्टाग्राम, ट्विटर या सोशल मीडिया अकाऊंटवर या चॅनेलविरुद्ध बेजबाबदार पत्रकारितेचा आरोप केला आहे. याविरुद्ध कारवाई करणार असल्याचे त्याने म्हटले आहे.  आपल्या हँडलवर त्याने एक निवेदनही जारी केले आहे.

अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिचा नवरा राज कुंद्रा याला अश्लील फिल्म रॅकेटच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. दररोज या केसमध्ये नवीन नवीन खुलासे होत आहेत. काही कलाकारांनी राज कुंद्रा याला पाठिंबा दिला आहे. तर काही कलाकारांनी राज कुंद्रावर झालेले आरोप बरोबर असून त्यांच्या मर्जीविरुद्ध देखील काही अश्लील कंटेंट चित्रित करण्यात आले होते, असे आरोप केले आहेत.

मुंबई पोलिस क्राइम ब्रान्चने प्रेस कॉन्फरन्स घेऊन आश्चर्यजनक खुलासे राज कुंद्राबाबत केले होते. बऱ्याच कलाकारांना वेबसीरिज आणि छोट्या मोठ्या फिल्म्समध्ये काम देण्याचे आमिष दाखवून त्यांच्या मर्जीविरुद्ध अश्लील फिल्म बनवल्या जात होत्या, असा आरोप मुंबई पोलिसांनी केलेला आहे. या सर्व केसमध्ये राज कुंद्राचा जवळचा मित्र आणि साथीदार उमेश कामत याच्यासोबत झालेले चॅटदेखील नुकतेच प्रसिद्ध झाले आहे. या चॅटमध्ये राज कुंद्रा आपला साथीदार उमेश कामत याला जुने अश्लील कंटेंट प्रसिद्ध करण्याबाबत बोलताना दिसून येत आहे.