अभिनेता सलमान खान (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

मराठी शोच्या वाचकांना कल्पना असेल की सलमान खानचा आगामी सिनेमा राधे- युअर मोस्ट वॉन्टेड भाई येत्या १३ मे रोजी ईदच्या निमित्ताने रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा डिजिटल प्लॅटफॉर्म्ससह थिएटरमध्येही प्रदर्शित केला जाणार आहे. सलमानसोबत या सिनेमात दिशा पटानी, जॅकी श्रॉफ आणि रणदीप हुडा महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेशी सगळा देश सध्या झुंजत आहे. असंख्य लोकांना या आजारामुळे आपले प्राण गमवावे लागले आहेत. या काळात कोरोनाचं अतिशय क्रूर भयप्रद रूप सगळ्यांना पाहायला मिळालं आहे. या कठीण काळात मनोरंजन क्षेत्रातले सगळेच सेलेब्रिटी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. एवढंच नव्हे तर अशा लोकप्रिय सेलेब्रिटींचे मोठमोठे फॅनक्लबसुद्धा वेगवेगळ्या शहरांमधून गरजूंना ऑक्सिजन आणि औषधंगोळ्यांचा पुरवठा करत आहेत.

सलमान खानला ही गोष्ट समजली तेव्हा त्याने सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसमोर आपला आनंद व्यक्त केला आहे. फॅनक्लबचा सेवाभाव पाहून खूप समाधान वाटल्याचं त्याने म्हणले आहे. ट्विटरवर लिहिलेल्या या पोस्टमध्ये त्याने ’बीईंग ह्युमन फॅन क्लब’ची एक यादीच दिली आहे. या सगळ्या फॅनक्लबच्या सदस्यांनी देशभरात गरजूंपर्यंत मदत पोहोचवली आहे.

या यादीनुसार, दिल्ली एनसीआरमध्ये या फॅनक्लबतर्फे ६८० ऑक्सिजन सिलेंडर्स दिले गेले असून इंदोर, भोपाळ, महू याठिकाणी ५५० सिलेंडर्स दिले आहेत. याशिवाय, पाटणा, लखनऊ, ललितपूर, जबलपूर, शिवपुरी, झाशी, हैदराबाद, चंदीगड, पालनपूर, अहमदाबाद याठिकाणीसुद्धा गरजूंना आवश्यक ती मदत पोहोचवली आहे.

देशातल्या वेगवेगळ्या प्रांतात जेवणाची पाकीटं वाटण्यात आली आहेत. स्वत: सलमान खाननेही मुंबईमध्ये कोरोना वॉरियर्ससाठी जेवणाची पाकीटं वाटली आहेत. सलमानने त्याच्या ट्विटमध्ये लिहिलं आहे की असे फॅनक्लब पाठीशी असल्यामुळे तो फार आनंदी आहे आणि स्वबळावर एवढं मोठं काम उभं करणाऱ्या या सगळ्यांना परमेश्वराचे आशिर्वाद मिळतील.