अभिनेता सोहम बांदेकर (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

आई-वडिलांच्या पावलांवर पाऊल टाकत सोहम बांदेकर आता मराठी मनोरंजन क्षेत्रात पदार्पण करत आहे. ‘लाडके भाऊजी’ अभिनेते सूत्रसंचालक आदेश बांदेकर यांनी निर्मिती केलेल्या ‘नवे लक्ष्य’ या मालिकेत सोहम महत्त्वाच्या भूमिकेतून पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर येणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवर ‘नवे लक्ष्य’ ही मालिका ७ मार्चपासून सुरू होत आहे. अभिनेते दांपत्य आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांचा सोहम मुलगा आहे. सोहम प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून मालिकेची निर्मिती करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलिसांच्या कार्याचा वेध ‘नवे लक्ष्य’ या मालिकेतून घेण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सुरक्षेसाठी आपले प्राण पणाला लावून सेवा देणाऱ्या पोलिसांची शौर्य गाथा या मालिकेत पाहायला मिळेल.

सोहम बांदेकरची ‘नवे लक्ष्य’ ही पहिलीच मालिका आहे. त्यामुळे या मालिकेतून तो छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे. आतापर्यंत अनेक स्टारकिड्सनी मालिका आणि चित्रपटातून मराठी मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकलं आहे. त्यात आता सोहम बांदेकरचीही भर पडली आहे. आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या दोघांनीही दीर्घकाळ छोट्या पडद्यावरील विविध मालिकांतून आपलं स्थान निर्माण केलं आहे. स्वाभाविकच त्यांच्या चाहत्यांमध्ये सोहमच्या पदार्पणाची उत्सुकता आहे आणि त्यालाही आई वडिलांप्रमाणेच प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळेल अशी अपेक्षा आहे.

पाच जिगरबाज पोलिसांनी उकल केलेल्या गुन्ह्यांची गोष्ट ‘नवे लक्ष्य’मधून टीव्ही वर भेटीला येईल. नवं कथानक आणि नव्या टीमसह युनिट ९ ची टीम सज्ज झाली आहे. या मालिकेत एका पोलिसाच्या भूमिकेत सोहम बांदेकर दिसणार आहे. सोहमची ही पहिलीच मालिका आहे त्यामुळे पदार्पणासाठी तोदेखील उत्सुक आहे.