आशय कुलकर्णी (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत अनिकेत ही भूमिका साकारत असलेला अभिनेता म्हणजे आशय कुलकर्णी. ‘माझा होशील ना’ मालिकेतील नकारात्मक भूमिकेद्वारे प्रेक्षकांकडून कौतुक मिळविल्यानंतर आता अनिकेत या भूमिकेद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. सोशल मीडियावरही आशय नेहमीच सक्रिय असतो. याद्वारे तो अनेक पोस्ट शेअर करत चाहत्यांशी संपर्कात असतो. नुकताच आशयने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये तो गिटार वाजवत गाणं गाताना दिसून येत आहे. तर त्याची ही गायनकला पाहून चाहते त्याचे भरभरून कौतुक करत आहेत.

आशयने शेअर केलेल्या व्हिडिओत, तो ‘बात हो तेरी मेरी’ हे गाणं गाताना दिसून येत आहे. गिटार वाजवत खूपच सुंदररित्या तो हे गाणं गात आहे. व्हिडिओ शेअर करत त्याने लिहिले की, ‘मी प्रयत्न केला. वाटलं की पोस्ट करावं आणि त्यानंतर डिलीट करावं’. आशयचं हे गाणं ऐकून चाहते मात्र त्याचे भरभरून कौतुक करत आहेत. अभिनयासोबत त्याची गायन कलासुद्धा खूपच भारी असल्याचे त्याला कमेंटद्वारे सांगत आहेत. तसेच आशयने खूप सुंदर गाणं गायलं असून हा व्हिडिओ डिलीट न करण्यासही त्याला सांगत आहेत.

आशयने कलर्स मराठी वाहिनीवरील ‘किती सांगायचंय’ या मालिकेद्वारे छोट्या पडद्यावर पदार्पण केले. या मालिकेत त्याने ओम देसाई ही भूमिका साकारली होती. मालिकेत त्याची जोडी नुपूर परूळेकरसोबत जमली होती. त्यानंतर तो झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना या मालिकेत डॉ. सुयश पटवर्धन या भूमिकेत दिसला. मालिकेत नकारात्मक भूमिकेमुळे त्याला चांगलीच लोकप्रियता मिळाली.

मालिकांसोबत आशयने ‘एक थी बेगम’ आणि ‘इडियट बॉक्स’ या वेबसीरीजमध्ये तर ‘फोटोकॉपी या चित्रपटातही काम केले आहे. सध्या तो ‘पाहिले न मी तुला’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. यामध्ये त्याच्यासोबत अभिनेता शशांक केतकर आणि अभिनेत्री तन्वी मुंडले मुख्य भूमिकेत आहेत.