आस्ताद काळे (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेने देशात परिस्थिती गंभीर करून टाकली आहे. एकीकडे लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला असतानाही दुसरीकडे कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. तसेच अनेक रूग्णांना बेड मिळत नाहीये तर अनेक ठिकाणी ऑक्सिजनचा तुटवडाही जाणवत असल्याचे समोर येत आहे. परिणामी, अनेकांचा मृत्यू होत असल्याचे चित्रही पाहायला मिळत आहे. यादरम्यान देशात ही परिस्थिती पाहता अभिनेता आस्ताद काळेने एक पोस्ट शेअर करत सरकार आणि राजकारण्यांवर ताशेरे ओढले आहेत.

आस्तादने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्याने त्याचा एक फोटो शेअर करत लिहिले की, ‘प्रश्न विचारायचे आहेत.. स्वत्व जपायचं आहे.. कदाचित जीव गमवावा लागू शकतो.. कारण.. श्शु!! कुठे काही बोलायचं नाही.. अरे हाड.. आम्ही प्रश्न विचारणार.. सत्तेच्या आणि सत्तेतल्या प्रत्येकाला.. उत्तरं न देता आम्हाला गप्प करू बघाल तर तुम्ही किती नागडे आहात तेच दिसणार.. नागडे राजकारणी.. नागडं सरकार.. नागडा देश.. निरोप घेतो’.

आस्तादची ही पोस्ट सध्या चर्चेत असून त्याच्या या पोस्टवर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. अनेकजण त्याच्या या मताशी सहमत असल्याचे सांगत त्याला या कठीण काळात सकारात्मक राहण्याचे सांगत आहेत. तर काहींनी मात्र, देशासाठी वापरण्यात आलेले शब्द उचित नसल्याचे कमेंटद्वारे सांगत आहेत. त्याच्या या पोस्टवर एकाने कमेंट करताना लिहिले की, ‘प्रिय आस्ताद सर. तुम्ही लिहिलं ते बरोबर आहे. पण, शेवटच्या दुसऱ्या ओळीतील शेवटचा शब्द मनाला नाही पटला. सरकार आणि राजकारणी लोक आहेतच नागडे पण, आपला देश तसा नाही आहे. ह्या सरकार आणि राजकारणी लोकांनी तसा बनवला आहे. माझी एवढीच विनंती आहे की, देशाला असा अपशब्द वापरू नका, एवढंच म्हणणे आहे’.

आस्ताद हा छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेता आहे. ‘पुढचं पाऊल’ या मालिकेमुळे त्याला खूप लोकप्रियता मिळाली. त्यानंतर त्याने अनेक मालिकांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील ‘बिग बॉस’ मराठी या शोमध्येही तो सहभागी झाला होता. या शोदरम्यानच तो स्वप्नाली पाटीलसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर यावर्षी १४ फेब्रुवारी रोजी ‘व्हॅलेंटाइन डे’चा मुहूर्त साधत या दोघांनी लग्नगाठ बांधली. आस्ताद ‘चंद्र आहे साक्षीला’ या मालिकेत शेवटचा दिसला होता.