अभिनेता अमिताभ बच्चन, शाहरुख खानसह अनेक कलाकारांच्या कार तसेच अनेक सेलिब्रिटींच्या व्हॅनिटी व्हॅन डिझाइन करणारे तसेच भारतातील पहिली स्पोर्ट कार डिझाइन करणारे डिसी डिझाइनचे संस्थापक प्रसिद्ध कार डिझायनर दिलीप छाब्रीया यांना फसवणूक आणि घोटाळ्याच्या आरोपांवरून काही दिवसांपूर्वी अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी कोर्टाने एक दिवसाची पोलिस कोठडी दिली. ‘द कपिल शर्मा शो’चा होस्ट कॉमेडियन कपिल शर्मा याच्या तक्रारीवरून त्याचा जबाब नोंदविल्यानंतर पोलिसांनी छाब्रीया यांना अटक केली होती. कपिल शर्माकडून त्याची व्हॅनिटी व्हॅन डिझाइन करण्यासाठी सहा कोटी रुपये घेऊनही त्यांनी वेळेत व्हॅनची डिलिव्हरी न दिल्याने त्याने त्यांच्याविरोधात खटला दाखल केला होता.
कथित स्वरूपात कार फायनान्स आणि बनावट रजिस्ट्रेशन रॅकेटशी संबंधांवरून मुंबई पोलिसांनी दिलीप छाब्रीया यांना 28 डिसेंबर 2020 रोजी अटक करून 2 जानेवारी रोजी गुन्हे शाखेच्या ताब्यात दिले होते. त्यांच्याकडे असलेली ‘DC अवंती’ ही कारही पोलिसांनी जप्त केली होती. छाब्रीया यांच्या या घोटाळ्यासंबंधीच्या माध्यमातील बातम्या पाहून कपिल शर्मानेही त्यांच्याविरोधात पैसे घेऊन फसवणूक केल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी 7 जानेवारी रोजी कपिल शर्माचा जबाब नोंदविल्यानंतर छाब्रीया यांच्याविरोधात खटला दाखल करून त्यांना मंगळवारी कोर्टासमोर हजर केले. त्यावेळी त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
अशी झाली कपिलची फसवणूक
यासंदर्भात माहिती देताना मुंबईचे पोलिस अधिकारी सचिन वाजे यांनी सांगितले की, ‘कपिल शर्माने दिलीप छाब्रीया यांना व्हॅनिटी व्हॅन डिझाइन करण्यासाठी मार्च 2017 आणि 2018 मध्ये साडे पाच कोटी रुपये दिले होते. त्यानंतर छाब्रीया यांनी जुलै 2018 मध्ये जीएसटीची आकारणी सुरू झाल्यामुळे आणखी 40 लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर पुन्हा एकदा कपिलकडे 60 लाख रुपये मागितले. पार्किंगच्या नावाखाली 12-13 लाखांचे वेगळे बिलही कपिलला पाठविले होते.’ या प्रकऱणी कपिल ‘एनसीएलटी’कडे दाद मागितल्यानंतर छाब्रीया यांची खाती गोठविण्यात आली. फसवणूक आणि घोटाळाप्रकरणात छाब्रीया यांना मंगळवारी कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर त्यांना एक दिवसाच्या पोलिस कोठडीत पाठविण्यात आले.
छाब्रीया यांना अटक झाल्यानंतर, ‘मला आनंद आहे की छाब्रीयासारख्या लोकांना अटक होत आहे’, असे कपिल शर्माने म्हटले होते. आर्थिक गुन्हे शाखा आता या प्रकरणाचा तपास करत आहे.