माझा होशील ना मालिकेचे चित्रीकरण सुरु (फोटो - इन्स्टाग्राम हँडलवरून साभार)

महाराष्ट्र सरकारने राज्यात लावलेल्या १५ दिवसांच्या लॉकडाऊनचा इतर क्षेत्राप्रमाणे मनोरंजन क्षेत्रालाही फटका बसला आहे. अनेक मालिका आणि चित्रपटांचे चित्रीकरण थांबले असून यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात व्यत्यय आला आहे. त्यामुळे प्रेक्षकांच्या मनोरंजनात खंड पडू न देण्यासाठी अनेक मालिकांचे चित्रीकरण महाराष्ट्राच्या बाहेर करण्यात येत आहेत. यादरम्यान झी मराठी वाहिनीवरील ‘माझा होशील ना’ या मालिकेचे चित्रीकरणही सिल्वासा येथे करण्यात येत आहे. त्यामुळे प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा सज्ज झालो आहोत, असे या मालिकेतील अभिनेत्री गौतमी देशपांडे हिने सोशल मीडियाद्वारे सांगितले आहे.

गौतमीने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ‘माझा होशील ना’ मालिकेचा नवीन सेट पाहायला मिळत आहे. तसेच यामध्ये सई आणि दादा मामा म्हणजेच गौतमी देशपांडे आणि विद्याधर जोशी यांचे सीन चित्रित करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. फोटो शेअर करत गौतमीने लिहिले की, ‘शुभारंभ… पुन्हा एकदा तुमच्या मनोरंजनासाठी सज्ज! असंच प्रेम करत राहा..मनोरंजन थांबलं नाही आणि थांबणारही नाही’

‘माझा होशील ना’ ही मालिका छोट्या पडद्यावर सध्या चांगलीच गाजत आहे. मालिकेतील सई आणि आदित्य म्हणजेच गौतमी आणि विराजस यांच्या केमिस्ट्रिलाही प्रेक्षकांकडून फार पसंती दिली जात आहे. तसेच या दोघांची जोडीसुद्धा फारच लोकप्रिय झाली आहे. या दोघांच्या जोडीचे अनेक चाहते असून सोशल मीडियावर तर सई-आदित्य नावाने अनेक फॅनपेजेस आहेत. तसेच नुकताच पार पडलेल्या झी मराठी पुरस्कार सोहळ्यात या जोडीला सर्वोत्कृष्ट जोडीचाही पुरस्कार मिळाला आहे. एवढेच नाही तर या पुरस्कार सोहळ्यात या मालिकेने सर्वात जास्त पुरस्कार पटकावत यामध्ये बाजी मारली आहे.

‘मनोरंजन थांबलं नाही आणि थांबणारही नाही’ म्हणत झी मराठी वाहिनीवरील अनेक मालिकांचे महाराष्ट्राबाहेर चित्रीकरण करण्यात येत आहे. यामध्ये ‘देवमाणूस’, ‘पाहिले न मी तुला’, ‘माझा होशील ना’, ‘येऊ कशी तशी मी नांदायला’, ‘अग्गंबाई सूनबाई’, ‘चला हवा येऊ द्या’ या मालिकांचा समावेश आहे.