अभिनेत्री प्रार्थना बेहेरे (फोटो सौजन्य : इन्स्टाग्राम)

झी मराठी वाहिनीवर ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही नवीन मालिका सुरू होत आहे. ह्या मालिकेत कोणते कलाकार आहेत, हे माहीत आहे का तुम्हाला? ओळखा पाहू.. तर बऱ्याच मोठ्या कालावधीनंतर अभिनेत्री प्रार्थना बेहेरे छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. तर अभिनेता श्रेयस तळपदे देखील याच मालिकेतून छोट्या पडद्यावर पुन्हा झळकणार आहे. श्रेयसने काही दिवसांपूर्वी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या मालिकेचा एक छोटा प्रोमो रिलीज करून आपल्या या मालिकेची घोषणा केली होती.

इंटरनेट स्टार मायरा देखील या प्रोमोमध्ये झळकली होती. ह्या छोट्याशा प्रोमोमधून तिने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आता या मालिकेचा दुसरा प्रोमो देखील रिलीज करण्यात आला आहे. आणि या प्रोमोमध्ये प्रार्थना बेहेरे पहिल्यांदाच झळकली आहे. ‘छोट्या पडद्यावर दहा वर्षांच्या मोठ्या कालावधीनंतर मी पुनरागमन करत आहे. तुमच्या घरातील, अगदी तुमच्यातली एक होण्यासाठी.. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहू देत..हीच सदिच्छा.. तुमचीच प्रार्थना बेहेरे.’ अशा शब्दांमध्ये प्रार्थनाने आपल्या चाहत्यांना आपल्या पुनरागमनाची बातमी दिली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर काहीसा कमी झालेला असताना बऱ्याच नव्या मालिका सुरू होत आहेत. तर या नव्या मालिकांमधून यशस्वी कलाकार छोट्या पडद्यावर पुनरागमन करताना दिसून येत आहेत. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहेरे, संजय नार्वेकर, अंकुश चौधरी, प्रिया बापट अशा बऱ्याच अभिनेत्यांनी छोट्या पडद्याकडे पुन्हा आपला मोर्चा वळवला आहे. प्रार्थना आगामी ‘फ्रेश लाईम सोडा’ या सिनेमांमध्ये झळकणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी तिची सहकलाकार असणार आहे. हा सिनेमा प्रार्थनाचा नवरा अभिषेक स्वतः दिग्दर्शित करणार आहे. दिग्दर्शन क्षेत्रातील त्याचा हा पहिलाच सिनेमा असणार आहे.