'रंग माझा वेगळा' मधील कलाकारांचा भन्नाट डान्स व्हिडिओ व्हायरल (फोटो - सोशल मीडियावरून साभार)

महाराष्ट्र सरकारने कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यानुसार इतर सर्व क्षेत्राप्रमाणे मनोरंजनसृष्टीही बंद आहे. त्यामुळे अनेक मालिकांचेही चित्रीकरण थांबले आहे. अशात अनेक कलाकार आपल्या घरी परतले असून कुटुंबीयांसोबत वेळ घालवत आहेत. यादरम्यान ‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत दीपाची भूमिका साकारणारी अभिनेत्री रेश्मा शिंदे मात्र, आपल्या कामाला खूप मिस करत असल्याचे म्हटले आहे.

रेश्माने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर एक थ्रोबॅक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करत तिने आपल्या कामाला खूप मिस करत असल्याचे म्हटले आहे. या व्हिडिओत दिसत आहे की, रेश्मासोबत ‘रंग माझा वेगळा’मधील इतर कलाकार ‘वाथी कमिंग’ या ट्रेडिंग गाण्यावर भन्नाट डान्स करत आहेत. मालिकेत दीपाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमादरम्यान या कलाकरांनी हा रील व्हिडिओ चित्रित केला आहे. त्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यावर अनेक लोकांच्या प्रतिक्रिया मिळत आहेत.

‘रंग माझा वेगळा’ ही मालिका आता वेगळ्या वळणावर येऊन पोहोचली आहे. दीपाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमासाठी इनामदार कुटुंबात जय्यत तयारी करण्यात आली. या कार्यक्रमासाठी सर्वजण तेथे पोहोचले असतात. मात्र, आनंदाच्या या प्रसंगी दीपाला कार्तिकची साथ मिळत नाही. कार्तिक दीपाला तिच्या पोटात वाढणारे बाळ त्याचाच असल्याचा पुरावा देण्यास सांगतो. कार्तिकच्या या विचित्र वागण्यामुळे दीपासोबत घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसतो. तर आता मालिकेत पुढे काय होणार ? हे जाणून घेण्यास प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता लागली आहे.

रेश्माबाबत बोलायचे झाल्यास तिने स्टार प्रवाहवरील ‘बंध रेशमाचे’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केले आहे. त्यानंतर तिने ‘विवाह बंधन’, ‘लगोरी- मैत्री रिटर्न्स’, ‘नांदा सौख्य भरे’, ‘चाहूल’ अशा मालिकेतही काम केले आहे. मराठीसोबत तिने ‘केसरी नंदन’ या हिंदी मालिकेतही  काम केले आहे.