अभिनेत्री रुचिरा जाधव (फोटो इन्स्टाग्रामवरुन साभार)

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘माझ्या नवऱ्याची बायको’ या लोकप्रिय मालिकेने मागील ४ वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केले होते. मार्चमध्ये या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. राधिका, शनाया, गुरुनाथ आणि माया या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात एक खास जागा निर्माण केली होती. या मालिकेत ‘माया’ ही भूमिका साकारणारी अभिनेत्री रुचिरा जाधव सध्या चर्चेत आहे. कारण रुचिराचे एक स्वप्न नुकतेच पूर्ण झाले आहे. तिचे हे स्वप्न एका फॅनने पूर्ण केले आहे. सोशल मीडियावर यासंदर्भात तिने पोस्ट शेअर केली आहे. तिची ही पोस्ट चाहत्यांचे सध्या लक्ष वेधून घेताना दिसतेय.

रुचिराने इन्स्टाग्रामवर ही पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलयं की, बाहुबली हा चित्रपट पाहून माझ्या मनात एक इच्छा निर्माण झाली होती. ती ही की, या चित्रपटात जसे देवसेनाचे मोठे पोट्रेट असते तसेच मोठे पोट्रेट मला माझे हवे आहे. रुचिराने तिची ही इच्छा तिच्या आईलाही सांगितली होती. तिची हीच इच्छा नुकतीच पूर्ण झाली आहे. या पोट्रेटने माझ्या हृदयाच्या कॅनव्हासवर एक खास जागा निर्माण केली आहे अशा शब्दांमध्ये तिने ही पोस्ट शेअर केली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. रुचिराने या पोस्टसोबत प्रोट्रेटसोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिचे सुंदर चित्र रेखाटलेले दिसत आहे. हे चित्र अगदी रुचिरासारखे हुबेहूब दिसत आहे. रुचिराने या तिच्या चाहत्याचे खास आभार मानले आहेत.

रुचिरा तिच्या चाहत्याने दिलेल्या गिफ्टमुळे खूपच खूश आहे. तिने चाहत्याचे आभार मानले असून हे सुंदर गिफ्ट माझ्या नेहमी हृदयाजवळ राहील असे ही तिने पोस्टमध्ये म्हटले आहे. या पोट्रेट म्हणजेच मोठ्या फोटो फ्रेमसोबतचे फोटो रुचिराने सोशल मिडीयावर शेयर केले आहेत. शिवाय आणखी एका चाहत्याने रुचिराला तिचं स्केच बनवूनही पाठवलंय. चाहत्यांचं मिळणारं हे प्रेम पाहून रुचिराला प्रचंड आनंद झाला असून तिने तो आनंद सोशल मिडीयावर शेयर केला आहे. तिच्या या फोटोंचे चाहत्यांनी कौतुक केले असून तिच्यावर लाईक आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.