गायक प्रथमेश लघाटे

‘सारेगमप-लिटिल चॅम्प’ फेम प्रसिद्ध गायक प्रथमेश लघाटे आता ‘लिटिल’ नक्कीच राहिलेला नाही. आजच्या घडीला महाराष्ट्रातील एक उमदा व भविष्यातील आश्वासक गायक म्हणून त्याच्याकडे पाहिले जात आहे. प्रथमेश सध्या लॉकडाऊनमध्ये संगमेश्वर तालुक्यातील आपल्या आरवली या गावी आहे. मात्र इथेही तो स्वस्थ बसलेला नाही. दरवेळी काही नवं करण्याचा ध्यास त्याला लॉकडाऊनमध्येही स्वस्थ बसू देत नाही. रसिकांसाठी प्रथमेश म्हणजे नाट्यसंगीत, अभंग, भक्तिगीतांचे खणखणीत नाणं! मराठी भाषेतील या गीतप्रकारात त्याची हातोटी आहे. सहजसुंदर आणि कसदार आलाप, ताना घेता घेता तो तितकेच भक्तीपूर्ण व भावपूर्ण गातो. त्यामुळे रसिकांना त्याची या गीतप्रकारांतील गाणी म्हणजे अवीट पर्वणीच!

लॉकडाऊनमुळे लाईव्ह कार्यक्रम करता येत नसल्याने प्रथमेशचे फॅन्स, संगीत रसिक त्याच्या गाण्याचा थेट आस्वाद घ्यायला मुकले आहेत. मात्र, प्रथमेशने त्याच्या रसिकांना आपल्या गाण्यापासून वंचित ठेवलेले नाही. तो त्याच्या गाण्याचा आस्वाद आपल्या ‘प्रथमेश लघाटे ऑफिशियल’ या युट्यूब चॅनलद्वारे रसिकांना देत आह.  याद्वारे त्याने दोन दिवसांपूर्वी आपल्या चॅनलवर प्रसारित केलेल्या गाण्याने रसिकांना अचंबित केले आहे.

प्रथमेश आणि मराठी गीतप्रकारांतील नाट्यसंगीत, अभंग, भक्तिगीत हे समीकरण बनले आहे. मात्र यावेळी त्याने एक वेगळा गीतप्रकार हाताळला आहे आणि तोही हिंदी भाषेतील! हा गीतप्रकार आहे “ग़ज़ल”! “मुकम्मल ग़ज़ल” शीर्षकाने नवीन सीरिज त्याने आपल्या ‘Prathamesh Laghate Official’ या युट्यूब चॅनलवर सुरु केली. या सीरिजचा पहिला एपिसोड दोन दिवसांपूर्वी त्याने प्रसारित केला आहे. यात त्याने गजलसम्राट गुलाम अली साहेबांची “चुपके चुपके रात दिन” ही लोकप्रिय ग़ज़ल सादर केली आहे. उर्दू शब्दांच्या उच्चारणावर कटाक्षाने लक्ष देत प्रथमेश ही ग़ज़ल खूप सुंदररित्या गायली आहे. हिंदीतील या गीतप्रकाराने त्याला साद घालणे विशेष आहे. तसेच “मुकम्मल ग़ज़ल” या सिरीजमध्ये अशा आणखी अप्रतिम ग़ज़ल प्रथमेशच्या आवाजात ऐकायला मिळणे ही निश्चितच रसिकांसाठी पर्वणी ठरणार आहे.

“चुपके चुपके रात दिन” ग़ज़लच्या या पहिल्या एपिसोडमध्ये रसिकांसाठी त्याने आणखी एक सुखद धक्का दिला आहे. प्रथमेश उत्तम गातो हे सर्वांना ज्ञात आहे, मात्र तो उत्तम तबलावादक आहे हे रसिकांना माहिती नसेल. या पहिल्या एपिसोडमध्ये ग़ज़लसाठी तबलावादनही त्यानेच केले आहे. नव्या तंत्रज्ञानामुळे ही किमया साधणे शक्य झाले आहे. आता रसिकांना प्रथमेश पुढच्या एपिसोडमध्ये कोणती ग़ज़ल घेऊन येतो ही उत्सुकता लागली आहे.

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *