आज तुमचं लग्न आहे आणि तुमच्या मागे कुणी भूत लागलं आहे, असं तुमच्या लक्षात आलं तर काय होईल? नुसतं भूत नाहीतर सुंदर देखण्या लग्नाळू मुलीचं भूत… आपली दातखिळी बसेल, थरथर सुटेल, घशाला कोरड पडेल, पण आपल्याकडच्या सिनेमात असं काहीही होणार नाही. आपण त्यात ही विनोद शोधू आणि काहीतरी वेगळं – भन्नाट प्रेक्षकांसमोर ठेवू. अगदीच याच विचारांवर आधारलेली, हॉरर – कॉमेडी जॉनरमधली मराठी वेब सीरिज म्हणजे भुताटलेला होय.

अगदी नावावरूनच भयाची कल्पना यायच्या खूप आधी विनोदाच्या अस्तित्वाची आणि दर्जाची कल्पना आपल्याला येते. लग्नाला निघालेला नायक, त्याची नायिका आणि नायकावर स्वार झालेली सुंदर देखणी भूत अशा वातावरणात ही कथा फुलत असली, तरीही अगदी पहिलंच दृश्य सोडलं तर पाच भाग आणि अख्ख्या सीजनमध्ये कुठेही अगदी किंचितशी भीती वाटू नये, याची पुरेपूर काळजी घेतली आहे. म्हणूनच या सिरीजला हॉरर कॉमेडी न म्हणता नुसतं कॉमेडी म्हटलं तरी हरकत नाही. पण इथले विनोद तरी आपल्याला हसवतात का? तर त्याचं उत्तर विशेष लक्ष न देता ऐकले तर नक्कीच हसवतात.

कथा आणि पटकथा अशा दोन्ही पातळींवर नोंद घ्यावी, असं काही या सीरिजमध्ये नाही. ही सीरिज संपूर्णपणे संवाद, त्याचं टायमिंग आणि अभिनय याचीच आहे.

शिवाजी लोटन-पाटील दिग्दर्शक म्हणून नावाजलेले आहेत. त्यांची इतर कामं बघता हे कामं त्यांचं आहे यावर विश्वास बसणे कठीण आहे. योगेश शिरसाट हा मुळात लेखक म्हणून विनोदी लिखाण करणारा नट- लेखक असल्याने संहिता थोडी बरी आहे, असे म्हणावे लागेल.

अभिनेते म्हणून प्रियदर्शन जाधव, सायली पाटील यांची ही सीरिज आहे. दोघांत असलेली चढाओढ आणि फुलून आलेली केमिस्ट्री मजेशीर असून, या संहितेला तितकाच जीव आहे हेच सत्य. याशिवाय सहायक अभिनेत्यांमध्ये असलेले प्रदीप पटवर्धन आणि सुनील होळकर यांची कामं उत्तम आहेत.

ही सीरिज वेळ काढून, विशेष लक्ष देऊन बघावी, असं यात काही नाही. पण अगदी सतत काही ना काही बघून अगदी वेगळं काहीतरी, हलकं आणि डोकं बाजूला काढून हसत येण्यासारखं बघायचं असेल तर ही सीरिज तुम्हाला अजिबात नाराज करणार नाही.

भाषा : मराठी (हिंदी डब)

भाग : सीजन एक, भाग ५

सोर्स : हंगामा प्ले, MX प्लेअर

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *