हळूहळू सई आता डिजिटल विश्वामध्ये आपले करिअर प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येते आहे.

सध्याचा काळ डिजिटल आहे. मालिकांपासून, सिनेमापर्यंत अनेक बिझनेस देखील डिजिटली येऊन चांगली कमाई करत आहेत. कमी वेळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा एक मार्ग म्हणजे डिजिटल होय. याचाच फायदा घेऊन अमेझॉन प्राइम, नेटफ्लिक्स यासारख्या ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी जगभर आपला विस्तार केला आहे. त्यानंतर भारतात ही बऱ्याच ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी जन्म घेतला. झी फाइव्ह त्यापैकीच एक. आता झी फाइव्हचे यूएस मध्येदेखील प्रस्थ वाढणार आहे. झी फाइव्ह यु एस ए ह्या नव्या प्लॅटफॉर्मचे अभिनेत्री प्रियांका चोप्राच्या हस्ते उदघाटन झाले होते.  भारतीय कंटेंट आता यूएस मधील लोकांनादेखील पाहता येणार आहे. साऊथ एशियासाठी ही एक मोठी अचिव्हमेंटच म्हणावे लागेल.

मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकरचा एक शो झी यूएसए या प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. ‘डेट विथ सई’ असे या शोचे नाव आहे. या शोमध्ये सई आपल्या चाहत्यांसोबत बऱ्याच गप्पा मारताना दिसून येणार आहे. त्याचप्रमाणे सई बद्दलच्या बऱ्याच गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही हा शो नक्कीच पाहिला पाहिजे. या शोची माहिती सईने स्वतः आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आपल्या चाहत्यांसाठी दिली आहे.

समांतर दोन या सीरिजमधील तिच्या दुहेरी भूमिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. हळूहळू सई आता डिजिटल विश्वामध्ये आपले करिअर प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येते आहे. मणिरत्नम यांच्या नवरसा या वेबसिरीजमध्ये देखील तीने विजय सेतुपती सोबत एक छोटासा पण महत्त्वपूर्ण रोल निभावला होता. बऱ्याच मराठी चित्रपट  आणि मालिकांमध्ये काम केलेली सई नुकताच एका हिंदी चित्रपटा मध्ये दिसली होती. मिमी या सिनेमात ती एका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसली होती. मालिका चित्रपट आणि आता वेबसीरिज हा सईचा प्रवास अतिशय थक्क करणारा आहे.