‘सोप्प नसतं काही’ आणि ‘जॉबलेस’ या दोन वेगळ्या विषयांनंतर 'प्लॅनेट मराठी' आता निपुण धर्माधिकारी, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे, मकरंद शिंदे दिग्दर्शित 'हिंग पुस्तक तलवार' ही प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ आता काही दिवसांतच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यापूर्वीच प्लॅनेट मराठीने आपल्या आगामी वेबसिरीजचे ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहेत. वेगळ्या धाटणीचे विषय असणाऱ्या या ट्रेलर्सना प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ‘सोप्प नसतं काही’ आणि ‘जॉबलेस’ या दोन वेगळ्या विषयांनंतर ‘प्लॅनेट मराठी’ आता निपुण धर्माधिकारी, नितीश पाटणकर, अनुपम बर्वे, मकरंद शिंदे दिग्दर्शित ‘हिंग पुस्तक तलवार’ ही प्रेक्षकांना खदखदून हसायला लावणारी वेबसिरीज प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाव ऐकूनच थोडे विचारात पडलात ना? काय आहे हे नक्की? या वेबसिरीजचे नावच इतके अफलातून आहे. त्यामुळे यात नक्की काय पाहायला मिळणार याविषयी सर्वांच्याच मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. जशी हाताची पाचही बोटे सारखी नसतात, तशीच मित्रपरिवारातील सर्वांचेच व्यक्तिमत्वही सारखे नसते. अशाच वेगवेगळ्या पार्श्वभूमीचा मित्रपरिवार एकत्र येऊन प्रेक्षकांना लोटपोट हसवणार आहे. नुकताच सोशल मीडियावर ‘हिंग पुस्तक तलवार’चा ट्रेलर प्रदर्शित झाला. ही वेबसिरीज बघताना तुम्हाला तुमच्या मित्रपरिवाराची नक्कीच आठवण येईल.

मित्रांच्या ग्रुपमध्ये प्रत्येकाची अशी एक विशेष ओळख असते. सर्वांचेच स्वभाव काही सारखे नसतात. या वेबसिरीजमध्येही तशाच काही ना काही खासियत असणाऱ्या भन्नाट व्यक्तिरेखा आहेत. कॉर्पोरेटच्या कटकटीला कंटाळलेला ‘अक्षय’ तर गर्लफ्रेंड आणि बॉसमध्ये अडकलेला ‘अमित’, साधी भोळी आणि इनोसेंट अशी ‘अमृता’, दुसऱ्यांची लग्न जुळवणारा पण स्वतःच्या गर्लफ्रेंडला प्रत्येक मुलीत शोधणारा ‘समर’ तसेच मित्रांमध्ये बडबड करणारा परंतु इतरांसमोर शांत असणारा ‘कौस्तुभ’, खूपच प्रॅक्टिकल असणारी ‘सानिका’ आणि प्रत्येकाच्या प्रॉब्लेमचे वन स्टॉप सोल्युशन देणारा ‘पांडे’. आता हे भिन्न स्वभावाचे सर्व जण जेव्हा एकत्र येतील तेव्हा काय धम्माल उडेल, हे प्रेक्षकांना ३१ ऑगस्ट पासून ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’वर पाहायला मिळेल. ओमकार रेगे आणि तन्मय कानिटकर यांनी ही वेबसिरीज लिहिली असून यात अक्षयची भूमिका शौनक चांदोरकर, अमितची भूमिका सुशांत घाडगे, अमृताची भूमिका केतकी कुलकर्णी, समरची भूमिका क्षितिश दाते, कौस्तुभची भूमिका नील सालेकर, सानिकाची भूमिका मानसी भवाळकर आणि पांडेची भूमिका अलोक राजवाडे यांनी साकारली आहे. ही धमाल गॅंग ‘हिंग पुस्तक तलवार’ मधून आपल्या सर्वांच्या भेटीला येणार आहे. एका पेक्षा एक हास्यकल्लोळ माजवणारी मंडळी एकत्र आल्याने ‘हिंग पुस्तक तलवार’ ही वेबसिरीज प्रेक्षकांचं खळखळून मनोरंजन करणार आहे हे मात्र नक्की.

‘हिंग पुस्तक तलवार’ बद्दल ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ”प्रेक्षकांना नेहमीच वेगवेगळ्या जॉनरचा कन्टेन्ट देण्याचा आमचा प्रयत्न आहे. दोन वेगळे, थोडे गंभीर विषय प्रेक्षकांच्या भेटीला आणल्यानंतर आता प्लॅनेट मराठी ‘हिंग पुस्तक तलवार’च्या माध्यमातून प्रेक्षकांना भरभरून हसवण्यासाठी सज्ज झाले आहे. वेगवेगळ्या स्वभावाचे मित्र जेव्हा एकत्र येतात, तेव्हा काय धमाका उडतो, हे यात पाहायला मिळणार आहे. हास्यकल्लोळ असलेली ही वेबसिरीज तरुणाईवर आधारित असली तरी सर्व वयोगटातील प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी आहे. सध्याच्या परिस्थितीत मित्रांना भेटणे, धमाल, मजामस्ती करणे दुरापास्त होत आहे. मात्र ही वेबसिरीज तुमच्या जुन्या आठवणींना उजाळा देणारी आहे आणि म्हणूनच ही सिरीज तुम्हाला तुमच्या जास्त जवळची वाटेल.”