हळूहळू सई आता डिजिटल विश्वामध्ये आपले करिअर प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येते आहे.

आजकाल जेवणात एकवेळ लोणचं असेल नसेल तरीही काहीही फरक पडत नाही पण जेवण करताना हातात मोबाइल किंवा लॅपटॉपवर कोणतीतरी वेबसीरिज सुरू असणं हे मस्ट झालेलं आहे. एकीकडे वेबसीरिज आणि प्रेक्षक यांचं नातं घट्ट होत असतानाच मोठमोठे सिनेदिग्दर्शक देखील वेबसीरिजमध्ये पदार्पण करताना दिसून येत आहेत. प्रियदर्शन, वसंत, गौतम वसुदेव मेनन, बिजॉय नामबियार, कार्तिक सुब्बाराज, सर्जुम के एम, कार्थिक नरेन, अरविंद स्वामी, रथींद्र प्रसाद ह्या नऊ दिग्दर्शकांच्या नऊ कहाण्या असलेली नवरसा ही सीरिज नेटफ्लिक्स ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. समांतर २ आणि नुकताच रिलीज झालेल्या मिमी ह्या सिनेमातून झळकलेली अभिनेत्री सई ताम्हणकर नवरसा या सिरीजमध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेमध्ये दिसून येणार आहे. सईने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती आपल्या चाहत्यांसोबत शेअर केली आहे .सईने या सीरिजमधून एक फोटो शेअर करत ही बातमी आपल्या चाहत्यांना दिली आहे.

प्रसिद्ध दिग्दर्शक मणी रत्नम ह्या सीरिजचे प्रोग्राम डिरेक्टर आहेत. मूळ तामिळ भाषेतील ही सिरीज सब टायटल्सच्या साहाय्याने पाहता येणार आहे. विजय सेतुपती, सूर्या, सिद्धार्थ, अशोक सेलवन, अंजली असे प्रसिद्ध आणि मोठं मोठे कलाकार ह्या सिरीज मध्ये पाहायला मिळतील. ६ ऑगस्ट पासून ही सिरीज नेटफ्लिक्स ह्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. ए आर रेहमान यांनी ह्या वेब सिरीजसाठी संगीत दिले आहे.

समांतरमध्ये सईने दुहेरी भूमिका साकारून आपल्या अभिनय कौशल्याची झलक पुन्हा एकदा दाखवली होतीच. महाराष्ट्रात तिच्या चाहत्यांची संख्या खूप मोठी आहे. आणि आता हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण केल्यानंतर तिचा चाहतावर्ग नक्कीच वाढलेला असणार यात काही शंकाच नाही.