ही सीरिज प्रामुख्याने दोन जणांची कथा आहे. एक म्हणजे शेअर ब्रोकर्स त्यांचं प्रतिनिधित्व करतो हर्षद मेहता आणि दुसरीकडे आहे सुचेता दलाल

नव्वदच्या दशकात हर्षद मेहता हे नाव घराघरांत पोहचलं होतं. भारतातला हा पहिला घोटाळा होता, ज्याचा आकडा काही हजार कोटींचा होता. ज्या काळात बहुतेक मध्यमवर्गीय लोक शेअर बाजाराला सट्टा किंवा जुगार म्हणत असत त्या काळात एका मध्यमवर्गीय कुटुंबातील व्यक्तीने हजारो कोटींचा घोटाळा करून सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. त्याच हर्षद मेहताची कहाणी अलीगढ, शाहिद यासारखे चित्रपट देणाऱ्या हंसल मेहताने छोट्या पडद्यावर आणली आहे. Scam 1992 Review

१९९२ साली झालेल्या या घोटाळ्याने सर्वांच्या झोपा उडवल्या होत्या. मोठमोठे अधिकारी, उद्योगपती आणि नेते आपली नावे या घोटाळ्यात बाहेर येऊ नये म्हणून देव पाण्यात बुडवून बसले होते. कित्येक वर्षं शेअर मार्केटवर या घोटाळ्याचं सावट राहिलं होतं. टाइम्स ऑफ इंडियाचे पत्रकार देवाशिष बसू आणि सुचेता दलाल यांनी हा घोटाळा समोर आणला होता आणि त्यावर वार्तांकन केलं होतं. त्यांच्याच ‘द स्कॅम’ या पुस्तकावर ही सीरिज आधारित आहे.

असं म्हणतात की पैशाने तुमची गरज भागू शकते पण लोभ नाही. पण एखाद्या माणसाला नेमकी किती पैशांची गरज आहे हे आपण कसं ठरवणार, हा प्रश्न माझ्या डोक्यात घुमत राहिला.

ही सीरिज प्रामुख्याने दोन जणांची कथा आहे. एक म्हणजे शेअर ब्रोकर्स त्यांचं प्रतिनिधित्व करतो हर्षद मेहता आणि दुसरीकडे आहे सुचेता दलाल. जी एक पत्रकार आहे. सुचेता दलाल या पहिल्या महिल्या बिजनेस रिपोर्टर नावाजल्या गेल्या आहेत.

एकेदिवशी त्या आपल्या ऑफिसमध्ये बसलेल्या असतात तेव्हा एक जण त्यांच्याकडे येतो आणि सांगतो की एसबीआयमध्ये ५०० कोटींचा घोटाळा झाला आहे आणि हा घोटाळा हर्षद मेहताने केला आहे. तेव्हा हर्षद मेहता हे इतकं मोठं नाव असतं की त्याला शेअर मार्केटचा अमिताभ बच्चन म्हटलं जात असे किंवा बिग बुल.

मग सीरिज ८० च्या दशकात फ्लॅशबॅकमध्ये जाते. हर्षद मेहता पडेल ते काम करत असतो. त्याच्या वडिलांना कपड्याच्या व्यापारात नुकसान सोसावं लागलेलं असतं. घाटकोपरमध्ये एका चाळीत ते राहत असतात. त्याचं घर छोटं असतं पण स्वप्न खूप मोठी असतात. तो पहिल्यांदा शेअर बाजाराबद्दल ऐकतो आणि शेअर बाजारातच काम करायचं ठरवतो.

पूर्वी ब्रोकरच्या हाताखाली ‘जॉबर’ काम करत असत. ग्राहकाला जे स्टॉक हवे आहेत त्यांची रिसिप्ट जॉबर देत असत. ही रिसिप्ट ग्राहक ब्रोकरकडे घेऊन जात असे तेव्हा व्यवहार पूर्ण होत असे. म्हणजे स्टॉक मार्केटच्या व्यवसायात जॉबर हे सर्वांत पहिलं पद होतं. या जॉबपासून सुरुवात करणारा हर्षद मेहता केवळ दहा वर्षांतच त्याच मार्केटचा बिग बुल कसा झाला याची ही कथा आहे.

जॉबर म्हणून काम करताना तो व्यवसायातले खाचखळगे शिकतो आणि स्वतः ब्रोकर होतो. हेराफेरी, इकडचा पैसा तिकडे फिरवणे, स्टॉकची किंमत वाढवून स्टॉक विकून टाकणे असं करून तो खूप सारा पैसा जमवतो.

ही कथा फक्त स्कॅमचीच नाही तर त्या काळात बॅंकिंग आणि फायनान्स क्षेत्र कसं काम करत होतं याची देखील आहे. इंटरनेट नसलेल्या आणि जागतिकीकरणाच्या आधीच्या काळात फायनान्स क्षेत्र कसं चालत होतं याची झलक आपल्याला पाहायला मिळते. खासगी बॅंकांकडे आणि विदेशी बॅंकाकडे आरबीआय कसं पाहतं, त्यांच्याशी कसं वागतं हे दिसतं. त्या काळात सेबीदेखील आहे पण त्या संस्थेचं महत्त्व फारसं वाढलेलं नाहीये.

अशा काळातला हर्षद मेहता हा प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे आणि आपण टाटा-अंबानींपेक्षा बिल्कुल कमी नाहीत असा त्याचा समज आहे. आपल्याला या मार्केटमध्ये बाहेरचं समजलं जातं याचा त्याला राग आहे. पिढीजात व्यावसायिकांना हरवण्यासाठी तो स्वतःच्या खिशातूनही पैसा टाकायला मागे पुढे पाहत नाही.

बॉलिवूडचे हे ५ प्रेरणादायी चित्रपट पाहिले नसतील तर एकदा बघाच!

अतिशय आक्रमक म्हणून त्याला सर्व जण बिग बुल म्हणू लागतात तर शेअर मार्केटमध्ये त्याची फेस व्हॅल्यू इतकी आहे जितकी अमिताभ बच्चनची फिल्म इंडस्ट्रीमध्ये आहे असं ओळखून काही लोक त्याला बीएसईचा अमिताभ बच्चन म्हणतात.

प्रत्येक गोष्ट नियंत्रणात ठेवण्याची त्याला इतकी सवय आहे की एका रविवारी तो क्रिकेट खेळत असतो. ख्रिसबाहेर येऊन चौकार ठोकण्याच्या प्रयत्नात त्याचा बॉल हुकतो पण कीपर त्याला स्टम्प आउट करत नाही आणि अंपायर तो बॉल वाईड म्हणून देतो. तेव्हा बॉलर चिडून त्याला म्हणतो की अंपायर आणि कीपरला तू किती कंट्रोल करतो. तेव्हा हर्षद म्हणतो जा बॉलिंग कर नाहीतर मला ते पण करावं लागेल.

यशाच्या एक एक पायऱ्या चढत असताना तो भरपूर शत्रू तयार करून घेतो आणि मग त्यांच्यात एक युद्धच सुरू होतं. ही सीरिज पर्फेक्ट फायनान्स थ्रिलर आहे. अनेक फायनांशिएल टर्म्स या सीरिजमध्ये येतात पण दिग्दर्शकाने त्या कथेत उलगडून दाखवल्या आहेत. त्यामुळे फायनान्सचे बॅकग्राउंड नसलेल्यांनाही ते कळण्यास काही अडचण होणार नाही.

Scam 1992 Review

दिग्दर्शक हंसल मेहतांनी ८०-९०चा काळ उत्तम उभा केला आहे. तेव्हाचे टेलिफोन, कपडे, घर, टीव्ही या सर्व गोष्टींवर अगदी बारकाईने काम करण्यात आलं आहे. पटकथा देखील वेगवान आहे. सर्व अभिनेत्यांनी त्यांचं काम उत्तमरीत्या पार पाडलं आहे. सतिश कौशिक आणि रजत कपूर छोट्या पण महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.

या सीरिजमध्ये हर्षद मेहताचं उदात्तीकरण नाही किंवा त्याला धिक्कारलेलं नाही. सुचेता दलाल यांच्या दृष्टिकोनातून आपल्याला ही कथा समजत जाते. सुरुवातीला ५०० कोटींचा असलेला स्कॅम पुढे ५००० कोटींचा कसा निघतो हे पाहणं देखील चित्तथरारक आहे.

  • पंकज कुलकर्णी