‘क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड’साठीची या वर्षीची वेब सिरीज, शॉर्ट फिल्मची नामांकने जाहीर / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

‘क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड’चे हे तिसरे वर्ष असून या अवॉर्डसाठीची नामांकने नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये बेस्ट वेब सिरीजसाठी ‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’, ‘पाताल लोक’, ‘आर्या’, ‘स्पेशल ऑप्स’ आणि ‘पंचायत’ यांच्यात स्पर्धा आहे. गेल्या दोन वर्षांच्या चांगल्या प्रतिसादानंतर ‘फिल्म क्रिटिक्स गिल्ड’ आणि ‘मोशन कंटेंट ग्रुप’ आता ‘विस्टास क्रिटिक्स कॅपिटल’ यांच्याबरोबर तिसऱ्या पुरस्कार सोहळ्याच्यानिमित्ताने एकत्र येत आहेत. या तिसऱ्या सिझनमध्ये भारतीय भाषांमधील प्रतिभा, कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान करण्यात येणार आहे. वेब सिरीज, शॉर्ट फिल्म किंवा फिल्म अशा कथा, कहाणी सांगणाऱ्या सर्वच माध्यमांचा यामध्ये सन्मान करण्यात येतो.

या वर्षीच्या ‘क्रिटिक्स चॉइस अवॉर्ड’साठी वेगवेगळ्या प्रकारांत वेगवेगळी नामांकने जाहीर करण्यात आली. लवकरच या सोहळ्याची तारीखही जाहीर करण्यात येणार आहे.

सर्वोत्कृष्ट वेब सिरीजसाठी ‘स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी’, ‘स्पेशल ऑप्स’, ‘पंचायत’, ‘आर्या’, ‘पाताल लोक’ यांना नामांकने जाहीर झाली.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी प्रतीक गांधी (स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी), जयदीप अहलावत (पाताल लोक), के. के. मेनन (स्पेशल ऑप्स), दिव्येंदु शर्मा (मिर्झापूर सीझन 2), बॉबी देओल (आश्रम) यांना नामांकने मिळाली.

सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीच्या नामांकनांमध्ये रसिका दुगल (मिर्झापूर सीझन 2), सुष्मिता सेन (आर्या), श्रेया धन्वंतरी (स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी), सुमुखी सुरेश (पुष्पावल्ली सीझन 2) आणि श्वेता त्रिपाठी (मिर्झापूर सीझन 2) यांचा समावेश आहे.

याबरोबरच सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्यासाठी चंदन रॉय (पंचायत), अभिषेक बॅनर्जी (पाताल लोक), हेमंत खरे (स्कॅम – द हर्षद मेहता स्टोरी), इश्वाक सिंह (पाताल लोक), चंदन रॉय सान्याल (होस्टेजस सीझन 2) यांना तर सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीसाठी नीना गुप्ता (पंचायत), शीबा चड्ढा (बंदिश बँडिट्स), स्वस्तिका मुखर्जी (पाताल लोक) आणि दिव्या दत्ता (होस्टेजेस सीझन 2) यांना नामांकने जाहीर करण्यात आली.

याशिवाय सर्वोत्कृष्ट लेखनासाठीची नामांकने सुमित पुरोहित, सौरव डे, वैभव विशाल, करण व्यास (स्कॅम 1992 – द हर्षद मेहता स्टोरी), सुदीप शर्मा, सागर हवेली, हार्दिक मेहता, गुंजीत चोप्रा (पाताल लोक), चंदन कुमार (पंचायत), नवीन रिचर्ड, आयशा नायर, सुमैरा शेख, कुमार शिवम, सुमुखी सुरेश (पुष्पावल्ली सीझन 2) आणि अनु सिंह चौधरी, संदीप श्रीवास्तव (आर्या) यांना जाहीर झाली.

शॉर्ट फिल्मच्या नामांकनांमध्ये सर्वोत्कृष्ट शॉर्ट फिल्मसाठी ‘बेबाक’, ‘द बूथ’, ‘मील’, ‘बी सेल्वी अँड डॉटर्स’, ‘धुम्मस’ यांचा नामांकने जाहीर झाली. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकासाठी शाजिया इकबाल (बेबाक), रोहिणी रविंद्रन नायर (द बूथ), अभिरूप बसु (मील), अरुण फुलेरा (संडे), दृश्या (बी सेल्वी अँड डॉटर्स) यांना नामांकने मिळाली.

श्रीकांत मोहन यादव (संडे), विपिन शर्मा (नाप), संजय मिश्रा (आधीन), आदिल हुसेन (मील), राजा चक्रवर्ती (टर्माइट्स) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्यासाठी, तर कलेरानी (बी सेल्वी अँड डॉटर्स), सारा हाश्मी (बेबाक), अमृता सुभाष (द बूथ), सीमा पाहवा (एव्हरीथिंग इज फाइन) आणि प्रमोदिनी नानावटी (धुम्मस) यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठीची नामांकने जाहीर झाली.

सर्वोत्कृष्ट लेखनासाठी शाजिया इकबाल (बेबाक), रोहिणी रविंद्रन नायर (द बूथ), के. आर. मीरा, नैनिशा डेढिया (धुम्मस), विक्रमजीत गुप्ता (ब्रिज), अभिरूप बसु (मील) यांना नामांकने मिळाली.

short films and web series nominations for critics choice awards