सिटी ऑफ ड्रीम्सचा सेकंड सीजन तीस जुलैपासून हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार आहे.

डिस्ने हॉटस्टारवरील सिटी ऑफ ड्रीम्स या वेब सीरिजमध्ये गायकवाड फॅमिलीमधील दाखवलेला सत्तेसाठी चालणारा संघर्ष तुम्ही पहिल्या सीझनमध्ये पाहिला आहे. आता या सीरिजचा दुसरा सीझन देखील लवकरच प्रदर्शित होणार आहे. आणि आज सेकंड सीझनचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. वडील विरूध्द मुलगी असा सत्तेसाठी चालणारा वाद सेकंड सीझनमध्ये दाखवला जाणार आहे.

मुंबईतील सर्वांत पॉवरफुल राजकीय माणसावर झालेला हल्ला आणि त्या हल्ल्यानंतर प्रत्येकाच्या आयुष्यात होणारे बदल आणि घडणाऱ्या अनेक घटना, सिटी ऑफ ड्रीम्सच्या पहिल्या सीझनमध्ये दाखवण्यात आल्या होत्या. आता दुसऱ्या सिझनमध्ये हा वाद अजून विकोपाला जाऊन एक वडील आणि मुलगी यांच्यामध्ये सत्तेसाठी होणारा संघर्ष दाखवला जाणार आहे. सत्तेच्या लालसेपोटी होणाऱ्या हत्या, सार्वजनिक ठिकाणी होणारे बॉम्ब ब्लास्ट, त्याचे सामाजिक आणि राजकिय स्तरावर होणारे परिणाम, पौर्णिमा गायकवाड आणि आशीष राव गायकवाड या दोघांवर झालेले विषप्रयोग अशा घटनांनी भरलेला सेकंड सीझनचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. हा ट्रेलर पाहून पहिल्या सीझन सारखाच सेकंड सिझनदेखील प्रॉमिसिंग असेल असे वाटत आहे. सिरीज मधील कलाकारांचे आणि सिरीजचे चाहते या सिरिजच्या प्रदर्शनाची नक्कीच आतुरतेने वाट पाहत असणार.

प्रिया बापट, सिद्धार्थ चांदेकर, अतुल कुलकर्णी अशी मराठीतील तगडी स्टारकास्ट या सीरिजमध्ये आहे. नागेश कुकुनूर या सीरिजचे दिग्दर्शक आहेत. सिटी ऑफ ड्रीम्सचा सेकंड सीजन तीस जुलैपासून हॉटस्टारवर प्रदर्शित केला जाणार आहे. सिटी ऑफ ड्रीम्सच्या दिग्दर्शकानीं याच थीमवर आधी एक सिनेमा बनवण्याचे ठरवले होते. पण त्याच वेळी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणाऱ्या वेबसीरिजचा जमाना चालू झाला होता. त्यामुळे त्यांनी आपले सिनेमा बनवण्याचे स्वप्न बाजूला सारून सिटी ऑफ ड्रीम्स ही तुफान भन्नाट पॉलिटिकल थ्रीलर वेबसीरिज बनवली होती.