चौकशीसाठी ‘तांडव’च्या दिग्दर्शकांच्या घरी पोहोचले उत्तर प्रदेश पोलिस; अली घरी नसल्याने घराबाहेर चिकटवली नोटीस / फोटो इन्स्टाग्रामवरून साभार

‘अमेझॉन प्राईम व्हिडीओ’ या ‘ओटीटी’वर प्रदर्शित झालेली पॉलिटिकल ड्रामा वेब सिरीज ‘तांडव’ प्रदर्शनानंतर लगेचच वादात सापडली. या सिरीजमध्ये भगवान राम, नारद आणि शंकर या हिंदू देवदेवतांचा अपमान झाल्याचा आरोप करून सिरीजवर बंदीची मागणीही करण्यात आली. दरम्यान, उत्तर प्रदेशातील हजरतगंजमध्ये या सिरीजचे दिग्दर्शक अली अब्बास जफर यांच्यासह काही जणांविरोधात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आली आहे. याचा तपास करण्यासाठी सध्या उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक मुंबईत दाखल झाले असून चौकशीसाठी हे पथक अली यांच्या घरी पोहोचले तेव्हा ते घरात नसल्याने पथकाने त्यांच्या घराबाहेर नोटीस चिकटवून त्यांना एका आठव़ड्यात लखनऊमध्ये हजर होण्यास सांगितले आहे.

तपास अधिकारी अनिल कुमार सिंह यांच्या नेतृत्वाखाली उत्तर प्रदेश पोलिसांचे पथक ‘तांडव’ या सिरीजच्या दिग्दर्शकांसह तक्रारीमध्ये आरोपी करण्यात आलेल्या सर्वांची चौकशी करणार आहे. यासंदर्भात चौकशीसाठी हे पथक गुरुवारी अली अब्बास जफर यांच्या घरी पोहोचले. मात्र, त्यावेळी अली घरी नसल्याने अधिकाऱ्यांनी त्यांच्या घराबाहेर नोटीस चिकटविली त्यामध्ये त्यांना 27 जानेवारीला लखनऊमध्ये तपास अधिकाऱ्यांसमोर उपस्थित राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यांच्या घराला कुलूप असल्याने त्यांच्या घराबाहेर नोटीस लावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, बुधवारी कोर्टाने अली अब्बास जफर यांच्यासह निर्माता हिमांशू मेहरा, लेखक गौरव सोळंकी आणि अमेझॉन प्राईमची कंटेंड हेट अपर्णा पुरोहित यांना अग्रिम जामीन मंजूर केला. त्यानुसार आरोपी करण्यात आलेल्यांना आता तीन आठवड्यांचा वेळ मिळाला आहे. जामीन मिळाला असल्यामुळे पोलिस सध्या कोणालाही अटक करू शकत नाहीत. ‘तांडव’वरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर सिरीजचे निर्माते अली अब्बास जफर यांनी याआधीच माफी मागितली आहे. तसेच ऩिर्मात्यांनीही माफी मागत आक्षेप घेण्यात आलेली दृश्येही सिरीजमधून काढून टाकली आहेत. त्यानंतरही हा वाद कमी होण्याची आणि या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या तक्रारी मागे घेण्यात येण्याची कोणतीही चिन्हे दिसत नाहीत.

यापूर्वी भाजपचे आमदार राम कदम यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ‘तांडव’च्या विरोधात मुंबईत पहिला खटला दाखल केला आहे. यापूर्वी लखनऊ, नोएडा, मध्य प्रदेश, रांची येथेही ‘तांडव’विरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

up police served notice to tandav director ali abbas zafar