हॉटस्टार वरील सिक्स ह्या वेब सिरीजमधून उर्मिला कोठारेचे ओटीटी पदार्पण (फोटो इन्स्टाग्राम वरून साभार)

सध्याचा जमाना डिजिटल आहे. आज काल मोठे मोठे सिनेमे देखील डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहेत. दर शुक्रवारी रिलीज होणारा सिनेमा आणि दोन तीन वाहिन्यांवरील मालिका सोडल्यास प्रेक्षकांकडे आधी बघण्यासाठी कोणतेही अधिक पर्याय उपलब्ध नसायचे. पण नेटफ्लिक्स, ॲमेझॉन, झी फाइव्ह, सोनी मॅक्स इत्यादी ओटीटी प्लॅटफॉर्ममुळे प्रेक्षकांकडे पाहण्यासाठी वैविध्यपूर्ण कंटेंट उपलब्ध आहे. त्यामुळेच हा जमाना आता वेब सीरिजचा जमाना आहे असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. मग यामध्ये आपले मराठी कलाकार कसे बरे मागे राहतील?

उर्मिला कोठारे ही आदित्य कोठारेची बायको आणि मराठी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. दुनियादारी, ती सध्या काय करते अशा बऱ्याच सिनेमांमध्ये ती दिसलेली आहे. पण बाकी कलाकारां सारखाच तिनेदेखील आपला मोर्चा आता वेब सीरिजकडे वळवला आहे. डिज्नी  हॉटस्टारवरील ‘सिक्स’ या वेब सीरिजमध्ये तिने काम केले आहे. या सीरिजमध्ये तिने नूर नावाच्या मुलीची भूमिका साकारली आहे. नूर ही एक साधी घरकाम करणारी गृहिणी दाखवली आहे. तिचा नवरा सौदी अरेबियामध्ये कामानिमित्त स्थायिक झालेला असतो. तो कधीतरीच तिला भेटायला येत असतो. एकाकी आयुष्याला वैतागलेल्या मध्यमवर्गीय स्त्रीची भूमिका तिने यात निभावली आहे.

‘सिक्स’ ही एक मर्डर मिस्ट्री सीरिज आहे. एक श्रीमंत धनाढ्य बिझनेसमॅन कशिश सुरा याच्या खुनाभोवती फिरणारी ही कथा आहे. या सीरिजच्या शूटिंगचे बरेच फोटो उर्मिलाने आपल्या इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केले होते. पण आता तिने नूर या सीरिजमधून आपला एक साधा, सरळ, सोज्ज्वळ लूक आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिने काळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केला आहे. अगदी हलकासा मेकअप आणि कुरळे केस याच्यामुळे ती अतिशय सुंदर दिसत आहे. चाहत्यांनी देखील या फोटोला प्रतिसाद देऊन कौतुक केले आहे. सिक्स ही सीरिज २७ मे रोजी डिझ्ने हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झालेली आहे.