भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा आयुष्याचा खेळ दाखवणं सीझन वन आणि सीझन टू दोन्हीमध्ये उत्तम जमून आलं आहे. सीझन दोन मध्ये सई ताम्हणकरची एण्ट्री झालेली आहे.  कुमार महाजनच्या आयुष्यात मीरा बनून आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात सुंदरा बनून सई ताम्हणकरने दुहेरी भुमिका सीझन टू मध्ये साकारली आहे.

लेखक सुहास शिरवळकर यांच्या समांतर या कादंबरीवर आधारित स्वप्नील जोशी आणि तेजस्विनी पंडित यांना घेऊन सतीश राजवाडेंनी समांतर ही वेबसीरिज बनवली. एमएक्स प्लेयरवर ही सीरिज प्रकाशित झाली आणि बघता बघता काही कालावधीमध्येच प्रसिद्ध झाली. फक्त मराठी भाषिकच नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांनी देखील ही सीरिज बघितली. याच सीरिजचा दुसरा सीझन आता प्रदर्शित झालाय.

सीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये स्वप्नील जोशी म्हणजेच कुमार महाजनला कळते की त्याचे आयुष्य हे सुदर्शन चक्रपाणी नावाच्या माणसाच्या आयुष्यासोबत समांतर चालू आहे. म्हणजेच भूतकाळात सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात जे जे काही झालं होतं, ते ते सर्व कुमार महाजनच्या भविष्यकाळात होत राहणार हे कुमारला कळते. चक्रपाणीच्या शोधात तो चिपळूणपर्यंत जातो. तिथे चक्रपाणी त्याला त्याने लिहिलेल्या डायऱ्या देतो. उद्याचे भविष्य आजच्या रात्रीच वाचायचं या एका अटीवर. “आणि माझ्या आयुष्यात एक बाई आली” हे भविष्य लिहीलेल्या पानावर येऊन सीझन वन संपला होता.

सीझन दोनमध्ये सई ताम्हणकरची एण्ट्री झालेली आहे.  कुमार महाजनच्या आयुष्यात मीरा बनून आणि सुदर्शन चक्रपाणीच्या आयुष्यात सुंदरा बनून सई ताम्हणकरने दुहेरी भुमिका सीझन टू मध्ये साकारली आहे. शांत, सुंदर, रहस्यमयी आणि तितकीच डेंजरस कुमार महाजनच्या आयुष्यात आलेली मीरा आणि स्वत:च्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची तयारी असलेली, चक्रपाणीच्या आयुष्यात आलेली चतुर, चालाक सुंदरा हे दोन्ही कॅरेक्टर्स सई ताम्हणकरने अतिशय उत्कृष्टरीत्या निभावले आहेत. कुमार महाजनच्या डिस्ट्रॉइड,अँग्री मॅनच्या भूमिकेमध्ये बसण्याचा स्वप्नील जोशीने पुरेपूर प्रयत्न केला आहे. स्वप्नीलवर चित्रित करण्यात आलेले शिवीगाळ करतानाचे आणि स्मोकिंग सीन्स थोडेफार गुळगुळीत वाटतात. कुमार महाजनची बायको निलिमाच्या रोलमध्ये तेजस्विनी पंडितने पुन्हा एकदा जीवतोड मेहनत घेतलेली दिसून येते.

भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांना जोडणारा आयुष्याचा खेळ दाखवणं सीझन वन आणि सीझन टू दोन्हीमध्ये उत्तम जमून आलं आहे. लायटिंग, लोकेशन्स, चित्रीकरण या सर्व गोष्टी परफेक्ट असल्या तरी सीझन टू चा वेग थोडा संथ वाटतो.