दोन वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी मिर्झापूरचा सीझन वन थांबवण्यात आला होता त्यानंतर सर्वांना उत्सुकता लागली होती की मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनमध्ये काय होईल.

Mirzapur 2 Review in Marathi दोन वर्षांपूर्वी ज्या ठिकाणी मिर्झापूरचा सीझन वन थांबवण्यात आला होता त्यानंतर सर्वांना उत्सुकता लागली होती की मिर्झापूरच्या दुसऱ्या सीजनमध्ये काय होईल. लालाच्या मुलीच्या लग्नामध्ये मुन्ना त्रिपाठी (दिव्येंदू शुक्ला) येऊन राडा करतो आणि अनेकांचे प्राण घेतो. त्यातच गुड्डूची पत्नी स्वीटी आणि त्याचा भाऊ बबलू हे दोघे मरतात. त्यानंतर हा पुढचा सीजन आला आहे.

गुड्डू (अली फजल) आणि गोलू (श्वेता त्रिपाठी) हे पोलीस आणि मुन्नापासून आपला जीव वाचवत उत्तर प्रदेशात वेगवेगळ्या ठिकाणी लपून बसले आहेत. पाच गोळ्या खाऊनही मुन्ना त्रिपाठी मरत नाही त्यामुळे आपण अमर आहोत अशी भावना त्याच्या मनात तयार होते.

कालीन भय्याची (पंकज त्रिपाठी) महत्त्वाकांक्षा वाढते आणि त्याला राजकारणात रस येऊ लागतो. सत्ता आणि प्रतिष्ठा दोन्ही मिळत असल्यामुळे राजकारणात जम बसवण्यासाठी तो पावले उचलतो. मिर्झापूरचं युनिव्हर्स आपल्याला आता नवं नाहीये. त्याच युनिव्हर्समध्ये अनेक घटना घडताना दिसतात आणि मिर्झापूर -२ ची कथा उलगडत जाते. या सर्वांमध्ये दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत की मिर्झापूरच्या गादीवर कोण बसणार आणि गुड्डू आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेणार का?

गुड्डू आणि गोलू हे बदला घेण्याच्या भावनेनी इतके पेटून उठलेले आहेत की त्या गोष्टीशिवाय इतर विचार येणंच आता त्यांना अशक्य बनलं आहे. त्यासाठी जे काही करता येईल ते करण्यास ते तयार आहेत. कालीन भय्या आणि मुन्नाचा बदला घ्यायचा असेल तर त्यांचं साम्राज्य खालसा केलं पाहिजे या विचाराने ते झपाटले जातात. सुरुवातीला ते त्यांच्या अफूच्या व्यवसायाला धक्का देतात. हातातून अफूचा व्यवसाय जातो आणि बबलू-गुड्डू असताना जसा बंदुकीचा व्यवसाय चालत होता तो देखील मंदावतो. त्यातच इलेक्शनसाठी पैसा गोळा करणं ही देखील जबाबदारी कालीन भय्याच्या खांद्यावर येऊन पडते.

इकडे मुन्नाला मिर्झापूरच्या गादीवर बसण्याची घाई झालेली असते तो त्याची इच्छा वारंवार बोलून दाखवतो पण कालीन भय्या त्याला भीक घालत नाही. तो त्याने ठरवलेल्याच मार्गावर चालतो. एक एक काम व्यवस्थित करून मुख्यमंत्र्यांच्या गुड बुक्समध्ये तो येतो आणि पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली होतो. पुढे कालीन भय्या आणि मुन्ना यांच्यात संघर्ष वाढेल की ते साथीदार होतील, गुड्डू आपला बदला घेईल की नाही या प्रश्नांची उत्तरं सीझन पाहिल्यावरच तुम्हाला मिळतील.

दुसऱ्या सीझनची जमेची बाजू ही आहे की त्यांनी सिरियलचं कथानक पूर्वांचल न ठेवता पूर्ण उत्तर प्रदेश आणि बिहारचा काही भाग इतकं घेतलं आहे. या भागात नवा बाहुबली देखील दिसतो. बिहारमध्ये दद्दा त्यागी (लिलिपुट किंवा एम. एम. फारूकी) आणि त्याची जुळी मुलं भरत आणि शत्रुघ्न यांचं वर्चस्व आहे. त्यांच्या मदतीने गोलू कालीन भय्याला आव्हान देते.

सीरिजमध्ये सर्वाधिक भाव खाऊन कोण गेलं असेल तर तो दिव्येंदू शर्मा आहे. त्याचं पात्र बहुरंगी आहे. तो शक्तिशाली आहे, उद्धट आहे आणि महत्त्वाकांक्षी आहे. कोणत्या वेळी तो काय करेल याचा नेम नाही त्यामुळे त्याला पाहणं हे मजेशीर ठरतं. सीरिजमध्ये पंकज त्रिपाठी आहे असं म्हणणं अंडर इस्टिमेशन ठरेल कारण कालीन भय्याशिवाय मिर्झापूरची कल्पनाच अशक्य आहे आणि त्याचा वावर नेहमी असं सुचवतो की मिर्झापूरचा तोच खरा राजा आहे.

त्या व्यतिरिक्त लिलिपूटने साकारलेला दद्दा त्यागी ही वेगळ्या धाटणीचा बाहुबली ठरतो. बऱ्याच वेळा लिलिपूटच्या वाट्याला फक्त कॉमेडी भूमिका आल्या आहेत पण यावेळी त्यांना गंभीर भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे आणि त्याचं त्याने सोनं केलं आहे.

अर्थात मिर्झापूरला जशा जमेच्या बाजू आहेत तसे काही कच्चे दुवे देखील आहेत. काही काही गोष्टी फक्त टाकायच्या म्हणूनच टाकल्या आहेत असं वाटतं. दोन तीन पात्रं सोडली तर इतरांवर काम केलंय असं वाटतच नाही. मिर्झापूरच्या गादीवरून रणसंग्राम सुरू आहे पण ती गादी नेमकी कशासाठी हवी आहे. त्यात काय स्पेशल आहे याचं उत्तर १० एपिसोड पाहून पण मिळत नाही.

हे लोक भांडण तर करत आहेत पण त्यांचा व्यवसाय चालतो कसा हे दाखवण्याचे कष्ट तर त्यांनी घेतलेच नाहीत. थोड्यावेळानंतर असं होऊन जातं की आपण जसा विचार करू लागतो तशाच गोष्टी पडद्यावर घडताना दिसतात त्यामुळे रटाळपणा येतो. गॅंगस्टर चित्रपटात किंवा सीरिजमध्ये जो मसाला आवश्यक आहे ते सर्वच या चित्रपटात येतं पण असंही वाटतं की मसाला तर आहे पण त्यात मुर्गीच नाही.

Mirzapur 2 Review in Marathi

हा सीझन म्हणजे चिप्सच्या पाकिटासारखा आहे. एक चिप्स खाल्ल्यावर आपण थांबू शकत नाही तसं एक एपिसोड पाहिल्यावर आपण थांबू शकत नाही बऱ्याच प्रश्नांची उत्तरं हवी आहेत म्हणून ते आपण पाहत जातो. पण चिप्सच्या पाकिटात जसे चिप्स कमी आणि हवा जास्त असते तसाच हा प्रकार आहे.

शेवटचा एपिसोड अत्यंत परिणामकारक झाला आहे. त्यामुळे इतर एपिसोडमध्ये त्यांनी जी कमी ठेवली त्याकडे आपण कानाडोळा करतो. मिर्झापूर -२ तुम्हाला निराश नक्कीच नाही करणार पण हा शो अधिक प्रभाव करता आला असता असं मला वाटतं.

  • पंकज कुलकर्णी