विद्या बालनचा शेअरनी हा सिनेमा ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. सिनेमामध्ये विद्या बालन एका वनविभाग अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. शकुंतला देवी, डर्टी पिक्चर, कहाणी अशा विविध भूमिकांनंतर विद्याला वनविभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहणे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक पर्वणी असेल.

विद्या बालनचा शेरनी सिनेमा ऍमेझॉन प्राईमवर प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शनानंतर हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. या सिनेमामध्ये विद्या बालन एक वनविभाग अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. नऊ वर्षांपासून ती ही नोकरी करत असते. ज्याच्यातील सहा वर्ष तिला ऑफिसवर्क मिळाले आहे. प्रमोशन न मिळाल्यामुळे वैतागून ती हा जॉब सोडण्याचा विचार करत असते. पण तिच्या नवऱ्याच्या अस्थिर नोकरीमुळे ती हा जॉब सोडत नाही. त्यात सहा वर्षांनंतर पहिल्यांदाच तिला फील्डवर्क करावं लागतं ते ही मध्य प्रदेशमधील बिलासपूर येथे. T१२ नावाची एक वाघीण ग्रामीण भागामध्ये शिरकाव करते. तसेच काही माणसांवर हल्ला देखील करते. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये वाघिणी बद्दल दहशत निर्माण झाली आहे. गावकऱ्यांकडून त्या वाघिणीला पकडून जंगलात सोडण्याची मागणी केली जाते.

त्याच दरम्यान तिथे निवडणुका असल्यामुळे T १२ वाघीण निवडणुकीचा मुद्दा बनते. दोन्हीही पक्ष गावकऱ्यांना विश्वास देऊ लागतात की आम्ही त्याग वाघिणीचा बंदोबस्त करू. वाघिणीला जिवंत मारून गावकऱ्यांचा विश्वास जिंकून निवडणुकीत मते मिळवणे हा एकच राजकीय हेतू पक्ष बाळगून असतात. त्यामुळे वाघिणीला जिवंत जंगलात सोडण्याच्या विद्याच्या विचाराचे कोणत्याही राजकीय पक्षाकडून समर्थन केले जात नाही.

विद्या त्या वाघिणीला वाचवू शकेल का? T१२ वाघिणीचे आणि तिच्या २ पिल्ल्याचे काय होणार? हे सिनेमात पाहाणे खरंच उत्सुकतेचे असेल. औद्योगिकरण आणि काही निवडक माणसांच्या आर्थिक भरभराटीसाठी गावकऱ्यांना आपल्या पोटापाण्यासाठी सहन करावा लागणारा त्रास, जंगली प्राण्यांबद्दल विद्याला असणारी आत्मीयता, स्वार्थी राजकारणाचे सामान्य जनतेला भोगावे लागणारे दुष्परिणाम हे सर्व मुद्दे सिनेमात लेखकाने व्यवस्थित मांडले आहेत.

न्यूटन सिनेमाचे दिग्दर्शक अमित मसूरकर हे या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत. वनविभाग अधिकारीच्या रोलसाठी विद्या बालनच पहिली निवड होती, असे त्यांनी एका मुलाखतीत सांगितले होते. मितभाषी पण आपल्या निर्णयावर ठाम अन् तेवढाच आपल्या व्यक्तिमत्त्वाचा दरारा निर्माण करण्यात विद्या या भूमिकेमध्ये एकदम परफेक्ट बसली आहे. सिनेमातील इतर  सहायक कलाकारांनी आपापल्या भूमिका अगदी चोख निभावल्या आहेत. शकुंतला देवी, डर्टी पिक्चर, कहाणी अशा विविध भूमिकांनंतर विद्याला वनविभाग अधिकाऱ्याच्या भूमिकेत पाहणे तिच्या चाहत्यांसाठी नक्कीच एक पर्वणी असेल.